पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव फक्त राजकारणासाठी घेतले जात आहे. परंतु त्यांच्याबाबत कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर कोणाला राग का येत नाही. महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते त्यावेळी राग कसा येत नाही. आता जनतेने विचार करणे गरजेचे आहे. महाराजांची अशी प्रतिमा तयार केली तर पुढच्या पिढीला महाराज असे होते असेच वाटेल. आता जनतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत. अशांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे.
उदयनराजे भोसले यांनी महाराजांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबाबत खंत व्यक्त केली. राजकीय स्वार्थासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहेत. परंतु, त्यांच्याबाबत गलिच्छ कोणी बोलले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही, याबाबत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला.
उदयनराजे पत्रकार परिषदेत भावूक
उदयनराजे पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक भावूक झाले. छत्रपतींचा अवमान होत असल्याचे पाहून मनाला वेदना होतात, असे सांगताना ते भावूक झाले. जर महाराजांची प्रतिमा मलिन होत असेल आणि प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर विमानतळांना महाराजांची नावं का द्यावीत? शिवाजी महाराजांची जयंती तरी का साजरी करायची? असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अवहेलना करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, त्यांचा फोटो लावता, अशी टीका करत त्यांनी तुम्ही त्यांच्या विचारांचा वापर करता तरीही तुम्ही जर अवहेलना करत असाल तर ते कृपा करून थांबवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे का?
आपल्याला खरचं शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना आपण शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. मात्र केवळ नाव देऊन काही फायदा नाही त्यांचे विचार आपल्यामध्ये कितीप्रमाणात रुजले आहे हे जास्त महत्वाचे आहे. राजांच्या नावाचा केवळ राजकीय उपयोग करण्यात आला आहे. जर त्यांचे विचार आपल्याला स्विकारायचे नसतील तर त्यांचे नाव घ्यायचा आपल्याला कुठलाच अधिकार नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
३ डिसेंबरला राजगडावर जाणार
राजगडावर तीन डिसेंबरला जाऊन आमच्या वेदना तेथे सभा होणाऱ्या सभेतून व्यक्त करणार. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार. असे उदयनराजे भोसले म्हणाले.