महाराष्ट्रात पावसाचा लंपडाव (फोटो- ai gemini)
राज्यात पावसाचा लपंडाव, पावसासाठी आणखी प्रतीक्षा
पुणे शहरात अद्याप अपेक्षित पहिला जोरदार पाऊस नाही
पावसाचा एक थेंबही न पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
पुणे: जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी पुणे शहरात अद्याप अपेक्षित पहिला जोरदार पाऊस पडलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढग दाटून येत असले, तरी अनेक भागांत प्रत्यक्षात पावसाचा एक थेंबही न पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही परिस्थिती पूर्णपणे नैसर्गिक असून मान्सूनपूर्व संक्रमण काळातील हवामान प्रक्रियेचा भाग असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) पुणे येथील वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, मान्सून दाखल होण्यापूर्वी पडणारा पूर्वमोसमी पाऊस हा सर्वदूर आणि एकसमान स्वरूपाचा नसतो. हा पाऊस मुख्यतः स्थानिक पातळीवरील तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे एका भागात जोरदार पाऊस तर दुसऱ्या भागात कोरडे वातावरण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
पूर्वमोसमी पावसाचे स्वरूप स्थानिक मर्यादित भागापुरते राहते. या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतात. याउलट प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेने युक्त सक्रिय वाऱ्यांमुळे व्यापक आणि सातत्यपूर्ण स्वरूपाचा असतो. त्यामुळे मान्सून सुरू झाल्यानंतर बहुतांश भागांत तुलनेने नियमित पावसाची नोंद होते.
Maharashtra Rain Alert: हे कसले नवीन संकट! मोठा पाऊस येणार की नाही? वाचा सविस्तर…
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता.९) कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता. १०) कमाल तापमानात आणखी दोन अंश सेल्सिअस वाढ होऊन ते ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी वारे राज्यातील इतर भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्याच्या अंतर्गत भागांत तुरळक ठिकाणी, तर किनारी भागांत अनेक ठिकाणी पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. ८ ते १० जूनदरम्यान किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.






