पावसाळापूर्व कामांना वेग, नगरपरिषदेकडून नालेसपाई वेळेत सुरु
कर्जत : पावसाळा दोन महिन्यांवर आला असून पावसाळा पूर्व कामांना कर्जत नगरपरिषदेने सुरुवात केली आहे.शहरातील आठ किलोमीटर लांबीचे नाले आणि २२ किलोमिटर लांबीचे गटारे हे स्वच्छ कचरा मुक्त करण्यासाठी कामे सुरुवात करण्यात आली आहेत.दरम्यान,नवीन मुख्याधिकारी यांच्याकडून एक महिना आधीच नालेसफाई सुरू करण्यात आल्याने कर्जत शहरवासीय आनंदी आहेत.
कर्जत शहराच्या मध्यभागातून उल्हास नदी वाहत असून पावसाळ्यात उल्हास नदीला दरवर्षी महापूर येतो. त्यावेळी अनेकदा नदी काठच्या लोकांच्या घरात महापुराच्या पाण्याचा धोका निर्माण होत असतो.ते लक्षात घेवून कर्जत नगरपरिषद कडून शहरातील नालेसफाई सुरू करण्यात आली आहे.कर्जत शहरात नव्याने पालिका मुख्याधिकारी म्हणून तानाजी चव्हाण रुजू झाले आहेत.त्यांनी शहरातील पावसाळ्यातील स्थितीची माहिती घेतली आणि तत्काळ पूर्व मौसमी कामे वेळेआधी पूर्ण करण्यात यावी यासाठी सर्व प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.त्यानुसार एप्रिल महिन्यातच कर्जत शहरातील नाल्यांची सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्यात शहरातील आठ किलोमीटर लांबीचे नाले यांची सफाई करण्यासाठी जेसीबी आणि पोकलन मशीन यांचा वापर सुरू केला आहे.
पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना करताना आधी शहरातील मोठया नाल्यांची सफाई करण्यास सुरुवात केली आहे.नाल्यांची साफसफाई सुरू करताना जेसीबी मशीन तसेच पोकलन मशीन यांच्या जोडीला स्थानिक पालिका कर्मचारी देण्यात आले आहेत.त्यामुळे मशीन ज्या ठिकाणी पोहचणार नाही त्या ठिकाणी पालिका सफाई कर्मचारी तो भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यावर्षी शहरातील नाले अधिक स्वच्छ होतील असे बोलले जात आहे.
शहरात विविध भागात २२ किलोमिटर लांबीचे गटारे आहेत. त्या सर्व गटारांची सफाई ही देखील सुरू करण्यात आली असून कर्जत शहरात यावर्षी लवकर गटारे स्वच्छ केली जात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.कर्जत शहरात नवीन मुख्याधिकारी रुजू करण्यात आल्यानंतर शहरातील पूर्व मौसमी कामे सुरू करण्यात आले असल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे.
तसेच शहरातील नागरिकांच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाशी संबंधित सर्व तक्रारी लक्षात घेवून कर्मचारी वर्गाकडून समस्या समजून घेतल्या.त्यानंतर एक निर्णय झाला असून कर्जत शहरातील नागरिकांच्या स्वच्छता बाबतीत समस्या प्राप्त झाल्यावर दुसऱ्याचं दिवशी सुटल्या पाहिजेत असे नियोजन केले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.