अंमली पदार्थांविरोधात करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० किलो २४८ ग्रॅम गांजा आणि मोटारसायकलसह एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गौरव उर्फ फंट्या दिलीप दोशी (रा. गुजर गल्ली, करमाळा) या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन
पोलीस हवालदार अर्जुन गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी सायकर प्लॉटिंग आणि देवीचा माळ परिसराकडे जाणाऱ्या चौकात मध्यरात्री सापळा रचला होता. संशयास्पद हालचाली करणाऱ्या फंट्या दोशी याला पोलिसांनी अडवून पंचांसमक्ष त्याच्या वाहनाची झडती घेतली. यावेळी त्याच्या मोटारसायकलवर पांढऱ्या पिशवीत लपवलेला २ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी ५० हजारांची मोटारसायकलही जप्त केली आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने आणि पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.






