संग्रहित फोटो
लातूर : शैक्षणिक क्षेत्रातील लातूर पॅटर्नला आजवर अनेकांनी हरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. प्रत्येक वेळी लातूर पॅटर्न अभेद्य आणि अजिंक्यच राहिला आहे भविष्यातही तो अजिंक्यच राहील, अशी ग्वाही माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नीट पेपर फुटी प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. याप्रकरणी फेसबुक वर व्यक्त होताना आमदार देशमुख यांनी सत्ताधारी पक्षाच्या पुढाऱ्यांची ‘पेपरफुटी प्रकरणी संदर्भहीन वक्तव्य करणारे उथळ पुढारी’ अशा शब्दांत संभावना केली.
पेपर फुटी प्रकरणांमध्ये सरकार सध्या करीत असलेल्या गतिमान कारवाईचे स्वागत करीत आमदार देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, या तपासात अटक झालेल्या मंडळींकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातून आणखीनही चौकशी आणि तपास सुरूच आहे तपास यंत्रणेने सखोल चौकशी करून या प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढावीत, अशी अपेक्षा आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईल. पुराव्याच्या आधारे न्यायालय कोण दोषी आहे ते ठरवेल. दोषी ठरणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा नक्कीच होईल. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने त्यांचे काम करीत असताना आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट झालेले असताना आपण काही टिप्पणी करणे योग्य राहील का, असा प्रश्न माझ्यासमोर होता. मात्र दरम्यानच्या काळात काही उलट सुलट चर्चा झाल्या. काही मंडळींनी अनावश्यक वक्तव्ये केली. पेपरफुटी प्रकरणी लातूर येथील एक निवृत्त प्राध्यापक आणि त्यानंतर एका क्लासचे मालक आणि आपल्या पाल्यासाठी पेपर विकत घेणाऱ्यांनाही अटक झाली आहे. दुर्दैवाने त्या अटकेला अनेक जुने संदर्भ जोडण्याचे प्रयत्न काही मंडळींनी केले आहेत. जे संदर्भ या बाबतीत सामाजिक माध्यमांनी दिले आहेत, ते सर्व तथ्यहीन आहेत. भूतकाळातील वक्तव्याचे वर्तमानकाळात संदर्भ जोडणे अजिबात शहाणपणाचे ठरत नाही. पण ज्यांनी संदर्भ जोडण्याचे असे प्रयत्न केले, त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही. ज्या पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. या सरकारच्या काळातच पेपर फुटीचे असंख्य प्रकार घडत आहेत.
मात्र सत्ताधाऱ्यांची वक्तव्ये संदर्भहीन
लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर सध्या जे सावट आले आहे, ते लवकरच दूर होईल आणि बावन्नकशी सोन्याप्रमाणे ‘लातूर पॅटर्न’ पुन्हा झळाळून निघेल, याचा मला विश्वास आहे. लातूरचा शैक्षणिक लौकिक कायम राखण्यासाठी लातूर पॅटर्नच्या उजळ माथ्याची चकाकी आणखीन वाढावी, यासाठी माझ्यासह सर्वांनी प्रयत्न करायला हवे आहेत. यासाठी लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांच्या सोबतीने मी आवश्यक ते योगदान, दिले आहे आणि पुढेही देत राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच मंडळींनी त्याचबरोबर पालक व विद्यार्थी या सर्वांनी मिळून त्याच जिद्दीने लातूरच्या शैक्षणिक यशाचे सातत्य कायम राखण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत, एवढेच माझे सांगणे आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही सर्वांचीच भावना आहे, असेही देशमुख यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंचे मोठे ‘राजकीय धक्कातंत्र’; आणखी एक पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन होणार?
भविष्य अंधकारमय
सुशिक्षित तरुणांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. अशा परिस्थितीत कोणत्या विषयावर बोलावे आणि न बोलावे याची परिपक्वता नसलेले सत्ताधारी पक्षाचेच उधळ पुढारी अशा संवेदनशील प्रसंगी राजकीय पोळी भाजण्यासाठी संदर्भहीन वक्तव्य करू लागले आहेत. खरे तर, त्यांचीच वक्तव्य आता संशयास्पद वाटावीत अशी माहिती पुढे येत आहे, असा टोला अमित देशमुख यांनी लगावला.






