MLC election 2026 एकनाथ शिंदेंचे मोठे 'राजकीय धक्कातंत्र'; प्रहार स आणखी एक पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन होणार?
या नव्या राजकीय घडामोडींमुळे शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फाटक यांच्या जागी क्षितीज ठाकूर यांची अनपेक्षित एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याआधी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी त्यांची प्रहार संघटना शिंदे सेनेत विलीन करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर हेदेखील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती पुढे येत आहे.
विधान परिषद निवडणुकीत मतांची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेकडून ही राजकीय खेळी केली जात असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या ऐवजी क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार भागात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. पण आता बहुजन विकास आघाडीदेखील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे विधान परिषद निवडणुकीत मतांच्या गणिताची जुळवाजुळव करण्यासाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली आहे.
बहुजन विकास आघाडीच्या या अनपेक्षित राजकीय समीकरणांमुळे शिंदे सेनेचे निष्ठावंत नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होऊ शकतो. रवींद्र फाटक हे स्वतः या जागेसाठी इच्छुक असून त्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी मोठे राजकीय धक्कातंत्र वापरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाटक यांच्या ऐवजी बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकुर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत प्रहार संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकीय धक्कातंत्र वापरण्यात आले होते, त्याच धर्तीवर यावेळी थेट बहुजन विकास आघाडीचे शिंदे सेनेत विलीनीकरण करून क्षितिज ठाकूर यांना रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य राजकीय हालचालीमुळे ठाणे आणि वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काही दिवसांत महायुतीच्या उमेदवारीबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






