मंचर : शिंगवे (ता. आंबेगाव) येथे कासार मळा परिसरात सोमवारी (दि.१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंदाजे एक वर्ष वयाचा बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळून आला. बहुदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शिंगवे कासार मळा येथील शेतकरी अनिल शिंदे दुपारी शेतात गेले असता त्यांना डाळिंबाच्या शेतामध्ये बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले असता वनपरीक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गनार्शनाखाली वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक शिवशरण, प्रदिप औटी, वनकर्मचारी शरद जाधव, संपत भोर, रेक्कू मेंबर मनोज तळेकर, नविन सोनवणे, दत्ता राजगुरू, ऋषिकेश कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
बिबट्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी बिबट्या नर जातीचा असून, साधारण एक वर्ष वयाचा आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत जखमी झाल्याचा अंदाज वनपाल प्रदिप कासारे यांनी वर्तवला आहे.