Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 09.09.2026
राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फेऱ्या तीव्र झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घरगुती क्रिकेट हंगामासाठी तीन नवीन भागीदारांसह १३० कोटी रुपयांचे नवे व्यावसायिक प्रायोजकत्व करार जाहीर केले आहेत
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी उत्तर-पूर्व भारतात पूरपरिस्थितीमुळे नद्या काठच्या भागांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. भारत आणि जपानच्या हवाई दलादरम्यान धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी जोधपूर येथे १४ दिवशीय ‘वीर गार्डियन-२०२६’ या संयुक्त युद्धसरावाची आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कॅनेडियन वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क (Tariff) लादल्यामुळे आणि जीएसए (GSA) च्या यादीतून कॅनेडियन उत्पादने हटवल्यामुळे दोन्ही देशांतील व्यापारी वाद विकोपाला गेला आहे.
09 Sep 2026 10:01 AM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची लेक दुआ ८ सप्टेंबर रोजी दोन वर्षांची झाली. लेकीच्या वाढदिवसानिमित्त दीपिका, रणवीर आणि दुआ यांनी खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, त्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दीपिका, रणवीर आणि दुआ यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दुआ कधी चेहरा लपवताना, तर कधी वडील रणवीरसोबत खेळताना दिसत आहे. तिघांचेही हे गोंडस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
09 Sep 2026 09:45 AM (IST)
पिंपरी चिंचवड: मंजूर बांधकाम नकाशाचे उल्लंघन करून पिंपरीतील महिंद्रा अँथिया सहकारी गृहरचना संस्थेच्या आवारात अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे उभारून ते भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरेश भाटिया यांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सोसायटीला नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी बांधकाम विभागाकडून स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरीतील नेहरूनगर परिसरातील महिंद्रा अँथिया ही गृहनिर्माण संस्था आहे
09 Sep 2026 09:35 AM (IST)
Malegaon News: मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित म्युनिसिपल शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सोपान बोरसे यांचा मंगळवारी शाळेच्या जिन्यावरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची भेट घेतली. मयत प्राध्यापक सोपान बोरसे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि 'इन कॅमेरा' (व्हिडिओ शूटिंगसह) करण्यात यावे, अशी ठाम मागणी शिवसैनिकांनी पोलिसांकडे केली आहे.
09 Sep 2026 09:26 AM (IST)
Kiran Mane Facebook Post: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक किरण माने आपल्या परखड आणि रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या मनोरंजन क्षेत्रात आणि नेटिझन्समध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे मराठी मनोरंजनसृष्टीतील बदलत्या ट्रेंडवर पुन्हा एकदा मंथन सुरू झाले आहे.
09 Sep 2026 09:19 AM (IST)
Tamil Nadu Politics: तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवून सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय सध्या राजकीय अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्ती कळगम (टीव्हीके) पक्षाविरोधात राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगमने (AIADMK) थेट एम. के. स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळगम (DMK) पक्षाला सोबत येण्याचे आव्हान दिले आहे. तसेच विजय यांच्या पक्षाविरुद्ध इतर नवीन पक्षही एकत्र येऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे.
09 Sep 2026 09:11 AM (IST)
Latur Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील ४२ वर्षीय तरुण सुनील बिरादार यांनी विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आरक्षणासाठीच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करत नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी उदगीर-लातूर रस्त्यावर मृतदेह ठेवून तीव्र रास्तारोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू केले.






