मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथील रहिवासी रवीना शिंदे या आपल्या कुटुंबासह मीरा भाईंदर महानगरपालिकेसमोरील महात्मा रेसिडेन्सी येथे व्यवसायासाठी भाड्याने गाळा घेण्याच्या प्रक्रियेत होत्या. यावेळी गाळा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका परप्रांतीय महिलेने रवीना शिंदे यांना “तुम्ही मराठी आहात, त्यामुळे इथे व्यवसाय करू शकत नाही” असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. “मराठी माणसाला स्वतःच्या राज्यात व्यवसाय करण्यापासून रोखले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
या घटनेची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने दखल घेत रवीना शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित घटनेची माहिती जाणून घेत मराठी उद्योजकांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मीरा-भाईंदर परिसरात मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची चर्चा रंगू लागली असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईसह राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे सक्तीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी आणि ओला-उबर चालकांसाठी प्रवाशांशी सुसंवाद साधता येईल इतपत मराठीचे ‘वर्किंग नॉलेज’ अनिवार्य केले होते . चालकांच्या विरोधामुळे शासनाने नरमाईचे धोरण स्वीकारून मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत १०० दिवसांची मुदतवाढ दिली आहे。
Sanjay Raut News: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात भाजपच्याही काही लोकांचा संबंध: संजय राऊतांचा आरोप






