MLC Election 2026: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग
MLC Election 2026: निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची घोषणा करताच परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या या जागेवर महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच पक्षांतील नेत्यांनी मुंबईत तळ ठोकत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असल्याने परंपरेनुसार या जागेवर शिंदे गटाचा नैसर्गिक दावा मानला जात आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढत्या संख्याबळाचा आधार घेत दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि भारतीय जनता पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्येच अंतर्गत चुरस रंगण्याची शक्यता आहे.
महायुतीतील प्रमुख इच्छुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विप्लव बाजोरिया, सईद खान, राम कदम, आनंद भरोसे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय भांबळे, सुरेश नागरे, यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय भाजपचे संतोष मुरकुटे, मिलिंद यंबल, गजानन घुगे यांच्याकडून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातही या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. मागील निवडणुकांमध्ये काँग्रेसचे पारडे जड राहिले असले, तरी यावेळी उद्धव ठाकरे गटाने थेट या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेस : सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सुरेश देशमुख
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : डॉ. विवेक नावंदर
उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षातील आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी इच्छुकांकडून मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू असून, कोणत्या पक्षाच्या पदरात ही जागा पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
परभणी-हिंगोली मतदारसंघातील संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 131
भाजप – 99
शिवसेना (शिंदे गट) – 77
काँग्रेस – 59
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 43
यशवंत सेना – 27
जनसुराज्य – 13
रासप – 5
अपक्ष – 6
पूर्णा शहर आघाडी – 2
जनता दल – 2
वंचित – 1
एकूण मतदारसंख्या ४६५ असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि मित्रपक्षांची साथ निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ विरोधकांमध्येच नव्हे, तर मित्रपक्षांमधील ताकदीची चाचणी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






