‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट’ आणि ‘श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जीवनदायी मोहीम राबवण्यात आली. या सोहळ्यात बोलताना सुनील गावस्कर कमालीचे भावूक झाले होते. ते म्हणाले, या धाडसी मुलांना भेटणे हा माझ्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव होता. या मुलांचा संघर्ष आणि रोटरी क्लब तसेच डॉक्टरांचे निष्काम काम खरोखरच प्रेरणादायी आहे. माझ्या मते, ही मुलेच खरी हिरो आहेत. योग्य वेळी मिळालेली मदत आणि दातृत्व यामुळे शेकडो मुलांचे प्राण वाचू शकतात, हे पाहून मन भरून आले.
जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी गेल्या सहा वर्षांत जवळपास १२ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २५० मुलांना अत्यावश्यक हृदयशस्त्रक्रिया आणि वैद्यकीय मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या शस्त्रक्रिया श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर येथे करण्यात आल्या.
IPL 2026 च्या संदर्भात सुनील गावस्कर BCCI वर का संतापले? समोर आले धक्कादायक कारण
‘गिफ्ट ऑफ लाइफ’ प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्याचा अधिकार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणतेही मूल उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शस्त्रक्रियेनंतर मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्यच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.
‘श्री सत्य साई संजीवनी सेंटर’च्या बालहृदयविकार शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभाता रश्मी यांनी या आजाराच्या गंभीरतेवर प्रकाश टाकला. भारतात दरवर्षी २ लाखांहून अधिक मुले जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असतात, ज्यातील ७० हजार मुलांना जन्मानंतर पहिल्याच वर्षात शस्त्रक्रियेची गरज असते. मात्र, गरिबी आणि उशिरा होणारे निदान यामुळे अनेकांना उपचार मिळत नाहीत. योग्य वेळी झालेली शस्त्रक्रिया या मुलांचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते, असे त्यांनी सांगितले.
या जागतिक दर्जाच्या मानवतावादी मोहिमेसाठी रोटरी क्लब ऑफ बर्लिन इंटरनॅशनल (जर्मनी), रोटरी क्लब ऑफ फोर्ट वेन (अमेरिका) या आंतरराष्ट्रीय संस्थांसह दिल्ली, मुंबईतील विविध रोटरी क्लब आणि रोटरी इंटरनॅशनलच्या ‘वर्ल्ड फंड’चे मोठे सहकार्य लाभले आहे. ‘एक एक ठोका जपताना’ शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवणारी ही मोहीम खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र ठरली आहे.






