‘सात दिवसांत नाले साफ करा’; कुर्ल्यात मनसे आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वत्सलाताई नगर परिसराला भेट देऊन नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी परिसरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, नाल्याच्या साफसफाईकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी बोलतान प्रदीप वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत प्रशासनाला इशारा दिला. येत्या सात दिवसांच्या आत सदर नाल्याची संपूर्ण साफसफाई करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वत्सलाताई नगर येथे मोठे जनआंदोलन उभारेल, अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली.
तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून नालेसफाईच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी मागणीही वाघमारे यांनी केली. नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






