नवी दिल्ली – आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती, पण त्यांनी साथ सोडली नाही. शेवटपर्यंत शरद पवार साहेब त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शरद पवार जवळचे झाले आणि आम्ही मात्र दूरचे झालो आहोत, अशी टीका शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्देशानंतर माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, कुटुंबप्रमुखाने मार्ग काढायचा असतो, मुलांनी नव्हे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवावे. उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही, असे स्पष्ट करत केसरकर म्हणाले की, आमच्या मित्रपक्षानेही एकनाथ शिंदे आणि आमच्या इतर नेत्यांवर भाष्य करू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जो मनाचा मोठेपणा होता तो उद्धव ठाकरे यांच्याकडेही आहे. आता उद्धव ठाकरे यांनीच आम्हाला आशीर्वाद द्यावेत. या संघर्षाचा शेवट गोड होईल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.