जालना : राज्यात मराठा आंदोलनाचा (Maratha Agitation) मुद्दा पेटत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणावर बसण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार, अंतरवाली सराटी या त्यांच्या गावामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. असे असताना आता त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावली असतानाही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. त्यांनी अनेकदा उपोषण, आंदोलनेही केली आहेत. त्यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरीही दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्यानुसार, ते याच मागणीसाठी ठाम असून, पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे.
सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
आमचा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास
इतके दिवस सरकारचा सन्मान केला आणि इतके दिवस कायद्याचे पालन केले. आचारसंहिता असल्यामुळे उपोषण पुढे ढकललं होतं. आता आम्हाला सगे-सोगऱ्यांचा कायदा हवा आहे. गरिबांना वेठिस धरलं जात आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आमचा त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.