'दोषींना कोणतीही माफी नाही...', मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, “अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहेत. अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही आरोपीला त्याची राजकीय पार्श्वभूमी, नातेसंबंध किंवा पद पाहून संरक्षण दिले जाता कामा नये. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, “मीरा-भाईंदर शहरात काही काळापासून लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे समोर येत आहेत. अशा घटनांकडे केवळ राजकीय विषय म्हणून पाहण्याऐवजी सामाजिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि सर्वसामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास कमी होतो.”
सरनाईक यांनी भाजप नेतृत्वालाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत म्हटले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि जबाबदार प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाशी संबंधित व्यक्तींवर अशा स्वरूपाचे आरोप होत असतील, तर पक्षानेही त्याची गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड किंवा राजकीय हस्तक्षेप होऊ नये.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगत सरनाईक म्हणाले, “मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी या प्रकरणाबाबत चर्चा करणार आहे. तसेच लेखी पत्रव्यवहार करून या घटनेची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे. पीडित मुलीला न्याय मिळणे ही सरकार आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा शेवट न्याय मिळेपर्यंत व्हायला नको. पीडित मुलीच्या शिक्षण, पुनर्वसन आणि भविष्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन. कोणत्याही दबावाखाली किंवा प्रभावाखाली तपास होऊ नये, यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी.”
दरम्यान, या प्रकरणामुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे. आरोपींना कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय मिळावा, अशी भावना शहरभरातून व्यक्त केली जात आहे. पोलीस तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






