पनवेल महानगरात मनसेची ‘मराठी’ स्टिकर मोहीम; नव्या नियमाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले
पनवेल : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभर वातावरण तापलेले असताना, पनवेल महानगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कडून ‘मराठी’ स्टिकर लावण्याची मोहीम राबविण्यात आली.
मनसेच्या या उपक्रमांतर्गत शहरातील विविध रिक्षा स्टँडवर जाऊन रिक्षांवर ‘मराठी’ असे स्टिकर लावण्यात आले. “मराठी माणसाची ओळख जपणे आणि स्थानिक भाषेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे,” असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या मोहिमेत मनसेचे महानगर सचिव पराग बालड, वाहतूक सेना जिल्हा संघटक सचिन जाधव, जिल्हा सचिव अतुल चव्हाण, तसेच वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष पूनम जैस्वाल आणि विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अहिल्यानगरमध्ये ‘ग्रामीण AI समिट’चा उत्साह; सावेडीतील माऊली संकुलात तंत्रज्ञानाचा जागर
परिवहन विभागाच्या नव्या निर्णयामुळे आधीच चर्चेला उधाण आलेले असताना या उपक्रमाला अधिक राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मराठी रिक्षाचालकांनी या मोहिमेला पाठिंबा देत आनंद व्यक्त केला. “मराठी भाषा येणे आवश्यकच आहे. सरकारच्या निर्णयामुळे आमच्यासारख्या स्थानिकांना न्याय मिळेल,” अशी प्रतिक्रिया काही चालकांनी दिली.
दरम्यान, काही ठिकाणी या निर्णयाबाबत आणि मोहिमेबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटत असून, गैरमराठी चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. पनवेलमध्ये ‘मराठी’ या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, या स्टिकर मोहिमेमुळे चर्चेला अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे.
स्टिकर मोहीम: मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईच्या उपनगरात (दादर, माहीम, अंधेरी) रिक्षांवर “मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा” असे स्टिकर्स लावले जात आहेत. या मोहिमेद्वारे मराठी तरुण रिक्षाचालकांना सन्मान आणि अधिक रोजगार मिळावा, तसेच परप्रांतीय चालकांच्या वाढत्या प्रभावाविरोधात मराठी चालकांना पाठबळ देण्याचा मनसेचा उद्देश आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठी रिक्षाचालकांच्या अंगावर आल्यास सज्जड दम (ठोकाठोकी) देण्याची भाषा वापरली आहे. “अनेक रिक्षाचालकांना मराठी येत नाही, ते प्रवाशांशी उद्धटपणे वागतात. अशांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार, १ मे २०२६ पासून मराठी न येणाऱ्या रिक्षा/टॅक्सी चालकांचे परवाने (License/Permit) रद्द केले जाऊ शकतात. या सक्तीच्या विरोधात ४ मे रोजी १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती आहे. रिक्षा संघटनांनी या नियमाला विरोध केला असून, नागपूरसारख्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेमुळे आगामी काळात मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.






