Satara News: सातारा अन् पंढरपुरात माजी सैनिकांसाठी साकारणार अद्ययावत संकुल! (Photo Credit- X)
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज सातारा व पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाकडील जागेच्या एकत्रित विकासासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय खंदारे (भा.प्र.से.), माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संतोष कुमार (भा.प्र.से.), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश गटणे (भा.प्र.से.), उपसचिव श्री. विजय पोवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे माजी सैनिक कल्याण (पुणे विभाग) संचालक, सातारा जिल्हाधिकारी, सोलापूर निवासी जिल्हाधिकारी, पंढरपूर देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले.
शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी पंढरपूर येथे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवास, प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रशासकीय सेवा तसेच अन्य आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सर्व सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत संकुल उभारण्याच्या प्रस्तावाबाबत सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सातारा व पंढरपूर येथील संबंधित जागांची सद्यस्थिती, जागांची तपासणी, उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा तसेच दोन्ही विभागांच्या जागांच्या एकात्मिक विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली.
मा. राज्यपाल महोदय यांचे निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या विकास प्रकल्पामध्ये पर्यटन विकासाबरोबरच माजी सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, विभागांमधील प्रभावी समन्वय आणि वेळबद्ध कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हा प्रकल्प राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी नवे मानदंड प्रस्थापित करणारा ठरेल, असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.






