मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील घटक पक्षही या मुद्दयावर तुटून प़डलेत. पुलवामा हल्ला हा मोदी सरकारनं घडवून आणला होता का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. पुलवामात आरडीएक्स पोहचलंच कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
काय म्हणालेत संजय राऊत ?
मलिक म्हणालेत ती बाब देशाला आधीच माहित होती. या हल्ल्यात काहीतरी गडबड घोळा आहे, हे सगळ्यांना माहित होतं. मोदी सरकार त्यावेळी सत्ताधारी होते, ते त्यावेळी लोकसभा निवडणुकांना सामोरे जात होते. निवडणुका जिंकण्यासाठी ते अशी काहीतरी गडबड करतील, अशी शंका होती. हे प्रश्न आम्ही विचारण्याचा वारंवार प्रयत्न केला, पुलवाम्यात आरडीएक्स पोहचलं कसं, इतका कडेकोट बंदोबस्त असताना त्या ठिकाणी आरडीक्स पोहचलं कसं, पुलवामाच्या रस्त्यावरुन कधीही सैन्यदल प्रवास करीत नाहीत. त्यांना एयरफोर्सनं किंवा सरकारनं विमान का दिलं नाही, त्यांची पुलवामात हत्या करावी, आणि नंतर त्याचं राजकारण करुन निवडणुका जिंकाव्यात, अशी काही योजना होती का. असे प्रश्न तेव्हाही विरोधकांनी विचारले. मात्र असे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, राष्ट्रद्रोही असं करुन गप्प करण्यात आलं. आज सत्यपाल मलिक जे राज्यपाल होते, मोदींनीच नेमलेले राज्यपाल होते. त्यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलंय. ते पुलवाम्याच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे.
या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे आणि जे मंत्री जबाबदार आहेत, त्यांचं कोर्टमार्शल व्हायला हवं, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपानं २०१९ सालच्या निवडणुकांत प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा केला होता.