एकाची जमीन दुसऱ्याच्या नावे! म्हावशी गावातील १७९ हून अधिक चुकीच्या नोंदींचा मुद्दा ऐरणीवर
याप्रसंगी भूमी अभिलेख कार्यालयाचा आढावा देताना अधिकारी सुप्रिया शिंत्रे यांनी ४२५ मोजणीची प्रकरणे पेंडिंग असून ११३ गावांचे स्वामित्व योजनेचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. यावर विरोधी भाजपचे सदस्य शंकरराव घाडगे यांनी चुकीचा सर्व्हे झाल्याचे सांगून या चुका दुरूस्त करण्यासाठी मोठी प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे निदर्शनास आणून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. यावर सदस्य विकास जाधव यांनीही तारळेत देखील हीच अवस्था असल्याचे सांगितले. सदस्य पंजाबराव देसाई यांनी स्वातंत्र्य पूर्व व आताचा नकाशा पाणंद रस्ते खुले करण्यासाठी पुढील बैठकीपूर्वी देण्याची मागणी केली. यावर उपसभापती विजय पवार यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगळी यंत्रणा राबवून जास्तीत जास्त रस्ते खुले करावेत, टार्गेट आले आहे, त्याच्यावर काम करावे. या योजनेत पाटण तालुका अग्रेसर रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी योग्य नियोजन करून काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना आता पूर्णविराम; सातबारावरील ‘ही’ कामे होणार ऑनलाईन
तालुका कृषी अधिकारी पंढरीनाथ बांबळे यांनी हवामान केंद्राची तपासणी योग्यरितीने सुरू आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. ८५ कृषी सेवा केंद्रे असून मागणी नुसार खत पुरवठा सुरू आहे. अनुदानावर बियाणे वाटप सुरू असल्याचे सांगितले. यावर उपसभापती पवार यांनी विशिष्ट प्रकारचे खत घेतले तरच बियाणे मिळेल, अशा प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हे खपवून घेतले जाणार नाही. तक्रारी न येता खत वाटप योग्यरितीने करा, अशा सूचना केल्या. सत्ताधारी सदस्य विकास जाधव व विरोधी सदस्य शंकरराव घाडगे यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी पूल व मोऱ्यांची पाहणी सुरू केली आहे. पावसाळ्यात वाहतूक अडथळा होणार नाही याची काळजी घेत आहे. भूसंपादनाचे १२ प्रस्ताव मार्गी लागले आहेत. निधी अभावी काही रस्त्यांची कामे रखडली आहेत. दिवशी घाटात भुस्खलन होणार नाही याची दक्षता घेतल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे भरून घ्यावेत. रस्त्यांची अपुरी कामे चांगल्या दर्जाची करावीत. नेरळेतील रस्ता करून एक वर्ष झाले नाही तरी खड्डे पडले आहेत ते भरावेत, अशा सूचना केल्या. सदस्य पंजाबराव देसाई यांनी गुढे-काळगाव रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी करत माणगाव रस्ता खचला असून अपघात घडण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
महिन्यात १०० युनिटपेक्षा कमी विजेचा वापर करणाऱ्यांसाठी शासनाने सौरऊर्जा योजना आणली आहे. यात एसटी, एनटीसाठी ५ हजार, दारिद्रयरेषेखालीसाठी २ हजार ५०० रुपये शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी शैलेंद्र कांबळे यांनी दिली. सदर योजना चांगली आहे. सुमारे ६ गावांनी योजनेचा फायदा घेतला आहे. आपले गाव १०० टक्के वीजबिल मुक्त कसे होईल हे पदाधिकाऱ्यांनी पहावे. जास्तीत जास्त गावे या योजनेत सहभागी होतील त्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच डोंगरभागातील गंजलेले, धोकादायक, वाकलेले पोल तातडीने बदलण्याच्या सूचना उपसभापती पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिले आल्याचे सदस्य विकास जाधव यांनी सांगितले, उपसभापती पवार यांनी संबंधित कुटुंबाची परवानगी घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका, अशा सूचना केल्या. सदस्य पंजाबराव देसाई यांनी मल्हारपेठ विभागात सर्वाधिक गंजलेले पोल असून एखादी घटना घडल्यास अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा देत शेती पंपाची वीज कपात करू नका, अशी मागणी केली.
१५ जूनला शाळा सुरू होत असून ज्या गावात एस. टी. बसेस सुरू होत्या, त्या गावातील बसेस सुरू ठेवाव्यात. विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना उपसभापती पवार यांनी केली. बसमधील वाहक व चालक प्रवाशांना उध्दट उत्तर देत असून वेगळी वागणूक देत असल्याची तक्रार सदस्या मंगल माने यांनी केली. स्मार्ट पीएससीचे काम अपूर्ण आहे. ठेकेदाराने ८ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून तुम्ही त्यांना सहकार्य करा. मरळी, मोरगिरी स्मार्ट पीएससीची कामे पावसाळ्यापूर्वी दर्जेदार व त्वरित पूर्ण करावीत. पालकमंत्री व सीईओ भेट देऊन पीएससीचे हस्तांतरण करणार आहेत. यात हयगय नको, अशा सूचना उपसभापती पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बोअरवेलसाठी ३६ प्रस्ताव पाठवले होते. पैकी १६ बोअरवेल मंजूर असून २० प्रस्तावांना मंजुरी नाही. ८ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भाट यांनी दिली. मंजूर बोअरवेलची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना उपसभापती पवार यांनी केल्या तर सदस्य पंजाबराव देसाई यांनी २०२७ साठी आतापासूनच टंचाईसाठी प्रयत्न करा, असे सांगितले. उपसभापती पवार यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३ बैठका झाल्या. पालकमंत्री यासाठी आग्रही आहेत. एकाही गावात टंचाई होता कामा नये, त्यादृष्टीने काम करा असे सांगितले. येरफळे गावात ठेकेदाराने काम अर्धवट केल्याने गावाला ३ दिवस पाणी नाही. लोकांनी स्वखर्चाने मोटार दुरुस्त केली. अधिकारी हलगर्जीपणा करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सदस्य शंकरराव घाडगे यांनी केली. तालुक्यात १ लाख ६७ हजार ३४७ लसीकरण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात ९ हजार ८३८ पंतप्रधान योजनेतील घरकुले मंजूर असून पैकी २ हजार ८२४ घरकुलांची कामे सुरू नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर उपसभापती पवार यांनी पहिला हप्ता देवूनही घरकुलाचे काम सुरू नसेल तर त्या लाभार्थ्यांवर कारवाई करून वसुली करा. ७,५०० घरकुले अपूर्ण आहेत. हा रेशो मोठा आहे. लोक प्रामाणिकपणे घरकुले बांधत आहेत. त्यांना वेळेवर हप्ते द्या. विनाकारण लाभार्थ्यांची अडवणूक करू नका. घरकुले पूर्ण व्हावी हाच आपला उद्देश असल्याचे सांगितले. ३०० घरे सुरू झाली आहेत. २,८०० घरकुलांची कामे सुरू आहेत. ज्यांना गरज नाही त्यांना रद्दचे प्रस्ताव देणार असून ८०० कामे सुरू होतील, असे गटविकास अधिकारी सरीता पवार यांनी सांगितले.
यावेळी सलग ३ मासिक बैठकांना बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने त्यांना नोटीस काढण्याच्या सूचना उपसभापती पवार यांनी दिल्या. यावेळी वनविभाग, शिक्षण, लघु पाटबंधारे, कृषी, ग्रामीण रुग्णालय, महिला बाल कल्याण विभाग, रोजगार हमी विभागाचा आढावा घेण्यात आला.
देऊन टाका मी हाय
गतवर्षीची १,४५१ लाख कर मागणी असून ६६.५५ लाख वसुली आहे. ७२ टक्के ग्रामपंचायतीकडून कर वसुली झाली आहे. मोठमोठ्या ग्रामपंचायतींकडून थकबाकीदारांची वसुली बाकी आहे. निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी काही जण थकबाकी भारतात. पुन्हा ते भरत नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढतच जाते. विविध दाखले देताना देऊन टाका मी हाय… अशा प्रकारे सदस्यच हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी सभागृहात केल्या. यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना उपसभापती पवार यांनी केल्या.






