Maharashtra Asselbly Election 2024 - Mahayuti
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये वेगाने घडामोडी होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पुरेसे यश न मिळाल्यामुळे आता महायुतीने जोमाने तयारी सुरू केली आहे. अशातच गुरूवारी (8 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महायुती समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीतच विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा देखील प्लॅन ठरल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात महायुतीचे समन्वय मेळावे आणि संवाद दौरे आयोजित करण्यात आले आहेत. येत्या 20 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीची एक सभा घेतली जाणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली.
प्रसाद लाड म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण येत्या 20 ऑगस्टपासून राज्यात महायुतीचे समन्वयचे मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन 20 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल. राज्यातील सातही विभागात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तर शेवटची सभा मुंबईत होईल.
प्रत्येक दिवशी किमान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघ कव्हर कऱण्याचा प्रयत्न असेल. हा दौरा जास्तीत जास्त सात ते दहा दिवसांचा असेल. ज्या मतदारसंघात सभा असेल त्या मतदारसंघातील स्थानिक नेते पदाधिकारी सभेमध्ये उपस्थित राहतील. पाच ते दहा हजाराचा लोकांचा एक मेळावा घेण्याचा प्रयत्न असेल. असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.
जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा झाली. आमच्यामध्ये जागा वाटप संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहमतीने एक आराखडा तयार केला जाईल. भाजप हा राष्ट्रीय पातळीचवरचा पक्ष असल्याने सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीच्या मार्फत घेतला जातो. तर केंद्रीय नेतृत्त्वाच्या अंतिम निर्णयानंतर जागा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी नमुद केले.