सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी पुण्याहून मुंबईला जाताना वसंत मोरेंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.
वसंत मोरे काय म्हणाले ?
माझं हे शक्तीप्रदर्शन पहिल्यांदा नाही. माझ्या मागे जनतेची शक्ती आहे ती शक्ती सातत्याने माझ्या पाठीमागे असते. आज जवळपास मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वचजण प्रवेश करत आहेत, असे वसंत मोरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचं ते राहू शकतात. परंतू पक्षात जे राजकारण सुरु होतं, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहे, असेही वसंत मोरेंनी म्हटले.