vasant more- uddhav thackeray
पुणे : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे आज (९ जुलै) आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. पण आज दुपारी १२ वाजता ते आपल्याअसंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार आहेत.
मनसेत झालेल्या अंतर्गत मतभेदांनंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केला. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून प्रयत्न केला. पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. पुण्यातून त्यांनी लोकसभेची निवडणुकही लढवली. पण त्यांचा पराभव झाला.
लोकसभेनंतर आत वसंत मोरे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने ते ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. पण वसंत मोरे यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याने पुण्यात ठाकरे गटाची ताकदही वाढणार आहे.
उद्धव ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे राजू शिंदे यांनी आपल्या आठ ते दहा माजी नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला. वसंत मोरेंप्रमाणेच राजू शिंदे हेही विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संजय शिरसाठ यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.