(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. चित्रपटामधील अभिनेत्री कंगना रणौतने स्वतः सांगितले आहे की हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौतने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना याबद्दल माहिती दिली आहे. आणि चाहते या बातमीने आनंदी झाले आहेत. तसेच हा चित्रपट ओटीटी कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
या तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंगना आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी दिसत आहेत. पोस्टमध्ये कंगना रणौतने लिहिले आहे की, ‘१७ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.’ चाहते १७ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर “इमर्जन्सी” पाहू शकतात. हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात ₹२१.६५ कोटींची कमाई केली आहे. आणि आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
काय आहे चित्रपटाची कथा?
कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’ चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा ऐतिहासिक आणीबाणीच्या काळाभोवती फिरते. १९७५ ते १९७७ पर्यंत भारतात आणीबाणी लागू करण्यात आली. या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच कंगना रणौतने या चित्रपटाचे दिग्दर्शनद देखील केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाख नायर आणि मिलिंद सोमण यांच्या भूमिका आहेत.सगळ्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटावरून झाले होते वाद
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूप पूर्वी प्रदर्शित होणार होता, परंतु शीख समुदायाच्या विरोधामुळे तो वेळेवर प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटात शिखांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप शीख समुदायाने केला होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शीख संघटना एसजीपीसीने चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. नोटीसमध्ये त्यांनी आरोप केला होता की चित्रपटात शिखांचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. त्यांनी चित्रपटातून वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची मागणी केली होती. यासंपूर्ण वादानंतर अखेर हा चित्रपट रिलीज झाला.