फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Swayambhu Movie : टीझर असो किंवा पहिलं गाणं ‘रा रा धीवरा’, ‘स्वयंभू’च्या प्रत्येक झलकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सत्य घटनांपासून प्रेरित आणि सेंगोलभोवती फिरणारा हा चित्रपट भारताच्या शौर्यशाली आणि गौरवशाली वारशाला पुन्हा जिवंत करत आहे. त्यामुळे या भव्य चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
‘कार्तिकेय २’च्या यशानंतर निखिल सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘स्वयंभू’ हा सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरला आहे. टीझरमधील भव्यता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, अप्रतिम दृश्यरचना आणि दमदार ॲक्शन सीक्वेन्स यांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. १८ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवत या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली. त्यानंतर प्रदर्शित झालेलं पहिलं गाणं ‘रा रा धीवरा’देखील प्रचंड गाजलं असून, यूट्यूबवर त्याला १३ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निखिल सिद्धार्थ आणि प्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सेंथिल कुमार हे चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनचं काम सुरू असलेल्या व्हीएफएक्स स्टुडिओला भेट देताना दिसत आहेत. ते कलाकारांशी चर्चा करताना, शॉट्सचं परीक्षण करताना आणि संपूर्ण सर्जनशील प्रक्रियेला मार्गदर्शन करताना दिसून येतात.
निर्मात्यांनी सांगितलं की, सर्वोत्तम दर्जाचा अनुभव देण्यासाठी ७५० हून अधिक सीजी कलाकार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत आणि २७०० पेक्षा जास्त व्हीएफएक्स शॉट्सवर काम सुरू आहे. त्यांनी प्रेक्षकांना आश्वासन दिलं की, चित्रपट पूर्णपणे परिपूर्ण बनवूनच प्रदर्शित केला जाईल आणि हा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव असेल.
हा अपडेट शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं, “स्वयंभूचं काम पूर्ण वेगात सुरू आहे. प्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सेंथिल कुमार आणि संपूर्ण टीमने स्वतः व्हीएफएक्स स्टुडिओला भेट दिली… २७०० व्हीएफएक्स शॉट्स, असं स्पष्ट करत प्रदर्शनाची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारताच्या गौरवशाली सुवर्णकाळाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाच्या टीझरने इतिहास, शौर्य आणि सांस्कृतिक अभिमानाने भरलेल्या कथानकाची झलक दाखवली आहे. सेंगोलच्या प्रभावी महत्त्वाभोवती फिरणारी ही कथा वारसा आणि धर्माच्या एका महाकाव्य प्रवासाची अनुभूती देते. निखिल सिद्धार्थ यात अत्यंत दमदार आणि तीव्र भूमिकेत दिसत असून, चित्रपटातील भव्य दृश्यं, प्रभावी नाट्य आणि थरारक ॲक्शनने प्रेक्षकांना विशेष प्रभावित केलं आहे.
या चित्रपटासाठी उद्योगातील दिग्गज तंत्रज्ञ आणि सर्जनशील कलाकारांची मोठी टीम एकत्र आली आहे. दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाला ‘केजीएफ’ आणि ‘सालार’साठी प्रसिद्ध असलेल्या रवि बसरूर यांचं संगीत लाभलं आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’चे छायाचित्र दिग्दर्शक केके सेंथिल कुमार यांनी याचे नेत्रदीपक दृश्य टिपले आहेत, तर ‘बाहुबली’चे तम्मीराजू यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. तब्बल १७० दिवसांच्या दीर्घ चित्रीकरणामुळे हा चित्रपट अलीकडच्या काळातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात आहे.
‘स्वयंभू’ची निर्मिती पिक्सेल स्टुडिओजचे भुवन आणि श्रीकर यांनी केली आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाला आणि अमर गौरवाला वाहिलेली ही भव्य सिनेमॅटिक आदरांजली समर २०२६ मध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.






