फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सध्या ती न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे असली तरी तिचे मन दिल्लीतील तरुणांसोबत असल्याचे तिने म्हटले. दिल्ली हे तिच्या बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाशी जोडलेले शहर असल्याचे सांगत तिने युवकांना प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या. युवकांनी केवळ दिखाऊ देशभक्ती न करता खऱ्या अर्थाने देशासाठी उभे राहावे, तसेच शांतता, संवेदनशीलता आणि समजूतदारपणाने आपली भूमिका मांडावी, असे आवाहन तिने केले.
अभिनेता अतुल कुलकर्णी यानेदेखील या आंदोलनाला समर्थन देत एक भावनिक पोस्ट लिहिली. देशातील तरुण आपला आवाज बुलंद करण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहत असल्याचे पाहून आशा वाटत असल्याचे त्याने नमूद केले. आपल्या पिढीकडून तसेच आधीच्या काही पिढ्यांकडून अनेक चुका झाल्या असून त्याचे परिणाम आजच्या तरुणांना भोगावे लागत असल्याची कबुली देत त्याने युवकांची माफी मागितली. तरुणांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि जबाबदारीच्या भावनेने देशाला नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
I am in beautiful Auckland right now with perhaps the cleanest air in the world. But I got Dilli on my mind. My beloved Delhi, city of my childhood, my school, my college…With huge parks and mature, kind trees… sending love to the youth of my country! May you choose to be true… — RichaChadha (@RichaChadha) June 6, 2026
याशिवाय अभिनेत्री कुनिका सदानंद आणि अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. देशातील युवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त केले. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नसतील, तर त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले असून त्यावर सरकारची भूमिका काय असेल, याची उत्सुकता वाढली आहे.






