(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“कापूसकोंडा” या नव्या चित्रपटातून एक खास ‘हिरो’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, हा हिरो माणूस नसून एक गोंडस कुत्रा आहे. या भुभूला कोणत्याही ऑडिशनशिवाय थेट मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याआधी ही जोडी “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटात झळकली होती. तसेच, मधुराणी गोखले या चित्रपटातून बर्याच काळानंतर कमबॅक करत आहेत.आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर “कापूसकोंडा” चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. एकूणच, गोंडस कुत्रा हिरो, जुनी हिट जोडी आणि खास कथा यामुळे “कापूसकोंडा” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित “कापूसकोंडा” चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले असून चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.
“कापूसकोंडा”चित्रपटाची कथा
हा चित्रपट एका सत्य घटनेवर प्रेरित असून त्याची कथा एका कुटुंबाभोवती आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याभोवती फिरते. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा खरा हिरो एक माणूस नसून एक कुत्रा आहे.कथानकात मानवी नाती, कुटुंबातील भावना आणि भावनिक संबंध यांना खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटणारी आणि भावनिक अनुभव देणारी आहे.या चित्रपटाला “A Family Dog Film” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.लेखक आणि दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करत “डॉगव्हर्स” (Dog Universe) तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. एकूणच, “कापूसकोंडा” हा फक्त चित्रपट नसून एक भावनिक आणि वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
या चित्रपटाचं कथानक हे अतिशय वेगळे आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असे कथानक मी कधी केले नाही. माझ्या भावनानसोबत या चित्रपटाचे कथानक मिळते जुळते असल्याचे मला जाणवले. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला असे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली सोबत वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. कथानक खुपच वेगळ्या धाटणीचं असुनही अगदी सहजपणे मांडलं आहे. सोबत सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी २२ वर्षांनी मिळणार होती.सचिन सरांसोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या असे अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी सांगितले.
उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे परंतु त्यासाठी अजून प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, तेव्हा भेटूया कापूसकोंड्याला लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.






