सपशेल फसलेली कॉमेडी आणि बुचकळ्यात टाकणारं कथानक; अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या Singham Again चा वाचा Review
आता रोहित शेट्टीचा चित्रपट येणार म्हटल्यावर धडाकेबाज ॲक्शन, अफलातून कॉमेडी, जबरदस्त ड्रामा आणि बरंच काही आपल्या डोक्यात येतं. नुकताच रोहित शेट्टीचा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पॉवरपॅक्ड ‘सिंघम अगेन’ चित्रपट रिलीज झाला आहे. २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘सिंघम’ चा हा तिसरा भाग आहे. आता ‘सिंघम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येतोय म्हटल्यावर सर्वांचीच उत्सुकता ताणलेली होती. १ नोव्हेंबरला ‘सिंघम अगेन’ रिलीज झाला असून जाणून घेऊया सिनेमाबद्दल….
हे देखील वाचा – या साऊथ अभिनेत्रीच्या जीवनावर बनणार डॉक्युमेंट्री, लवकरच होणार ओटीटीवर प्रदर्शित!
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटात निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी रामायणाचा आधार घेतला आहे. कथानकाबद्दल आपल्याला ट्रेलरमध्ये कळूनच आलं असेल. रामायणाचा आधार घेत सपशेल फसलेली कॉमेडी आणि बुचकळ्यात टाकणारं कथानक तुम्हाला पाहायला मिळेल. नाविन्याचा अभाव, कुठे तरी कमी पडलेली ‘सिंघम’ची जादु आणि रामायणाचा आधार घेत फसलेली ॲक्शन तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने तर निर्मिती रोहित शेट्टी, अजय देवगण आणि ज्योती देशपांडेंनी केले आहे. अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, दयानंद शेट्टी, श्वेता तिवारी आणि रवी किशन अशी तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल.
काश्मीरमध्ये तैनात असलेला बाजीराव सिंघम आणि रामलीलेतून रामायण सादर करणारी त्याची पत्नी अवनीची ही कथा आहे. सिंघमवर हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेकी ओमर हाफिजला सिंघम पकडतो. त्यावेळी ओमर त्याला सांगतो की, कोणीतरी माझ्यापेक्षाही डेंजर असून, तो येणार आहे. दोन वर्षांनी ओमरचा नातू डेंजर लंका अवनीचे अपहरण करून तिला श्रीलंकेमध्ये नेतो. त्यानंतर सिंघम आणि त्याची टीम अवनीला सोडविण्यासाठी कशा पद्धतीने जीवाची बाजी लावते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल. या कॉप युनिव्हर्समध्ये बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट आहे. जसजशी चित्रपटामध्ये कलाकारांची एन्ट्री होते, तसतसा चित्रपट अधिकाधिक रटाळ होतो. अख्ख्या चित्रपटामध्ये, अजय देवगण, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंहची एन्ट्री ठिकठाक आहे. पाहुणा कलाकार म्हणून तुम्हाला सलमान खानसह अनेक कलाकार दिसतील.
मुख्य बाब म्हणजे, अजय देवगण जरी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असला तरीही अख्खा भाव रणवीर सिंगनेच खाल्लाय. चित्रपटातील सर्व कलाकारांनी संमिश्र अभिनय केला आहे. अनेकांनी चांगल्या पद्धतीचा अभिनय करण्याचा प्रयत्न केला असून काहींनी इतक्या चांगल्या पद्धतीचा अभिनय केला नाही. मुख्य बाब म्हणजे, सिंघम आणि रामायणाचा संबंध दिग्दर्शकांना इतक्या उत्तम पद्धतीने जमलेला नाही. कथानकात गडबड, चुकीचा संबंध, व्यक्तिरेखेत सुस्पष्टता आणि कथेचे संकलन अशी तुम्हाला नकारात्मक बाजू दिसेल. तर सकारात्मक बाजूबद्दल सांगायचं तर, संवाद, सिनेमॅटोग्राफी, गीत- संगीत, कलाकारांचा अभिनय अशा जमेच्या बाजू आहेत. त्या शिवाय, रोहित शेट्टीने चित्रपटाचं दिग्दर्शन दिलासादायक केलं असून प्रेक्षकांनी चित्रपटातील काही मोजक्याच सीन्सवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला आहे. चित्रपटामध्ये कोणताच ट्वीस्ट नसून दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या कथानकावर आणि स्क्रिप्टवर काम करण्याची गरज आहे.
अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा सरासरी चित्रपट असून तुम्हाला पडद्यावर स्टार्सची भांडणे पाहण्याची आवड असेल तर हा चित्रपट पहा. हा चित्रपट तुम्हाला तेव्हा पसंत पडेल, जेव्हा तुम्ही तुमचं डोकं घरी ठेवून फक्त तुमच्या आवडत्या स्टारला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाल.