Photo Credit- Social Media
ऑपरेशन ब्लु स्टार च्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथील चौक मेहता येथे शीख समुदायातील एका गटातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. गिरीश महाजन यांची या कार्यक्रमातील उपस्थिती खळबळजनक ठरली असून गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त विधानाने आता काँग्रेसच्या गोटातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस असल्याचे वक्तव्य महाजन यांनी केल्याने आता देशभरातून टीका होत आहे. अश्यातच आता महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गिरीश महाजनांवर सडकून टीका केली आहे. “गिरीश महाजन यांना ना इतिहास माहिती, ना यांचा कुठल्या विषयाचा अभ्यास आहे, परंतु भाजप सत्तेसाठी इतक्या खालच्या परिस्थितीवर जाऊ शकतो याचे हे उदाहरण आहे,” असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिले.
दमदमि टकसालच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शीख संत, धार्मिक नेते आणि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्यासपीठावर दमदमि टकसालचा माजी प्रमुख जर्नेलसिंह भिंद्रनवाले, जनरल सुभेगसिंह, शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष अमरिकसिंह यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. याशिवाय ऑपरेशन ब्लु स्टारदरम्यान नुकसान झालेल्या अकाल तख्ताचे छायाचित्रदेखील लावले होते. गिरीश महाजन यांनी यावेळी ऑपरेशन ब्लु स्टारच्या दिवसाला काळा दिवस संबोधत ‘तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचे’ त्यांनी यावेळी म्हंटले. यावरून, सचिन सावंत यांनी X वर पोस्ट करत महाजनांवर निशाणा साधला.
सचिन सावंत यावेळी म्हणाले, “गिरीश महाजन या व्यक्तिमत्वाला अतिरेकी, खलिस्थान, ऑपरेशन ब्लू स्टार या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर पिस्तूल घेऊन जाऊन भाषण करण्याजोग्या किंवा गाववाल्यांना दाखवण्यासाठी पिस्तूल घेऊन बिबट्या शोधण्याजोग्या वाटतात असे दिसते. या व्यक्तीमत्वाला ना इतिहास माहिती ना यांचा कुठल्या विषयाचा अभ्यास आहे. दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात जाणाऱ्या व्यक्तीला अतिरेकी जवळचा वाटला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. परंतु भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी आणि मतांच्या राजकारणाकरता इतक्या खालच्या परिस्थितीवर जाऊ शकतो, इतका दुटप्पीपणा करू शकतो याचे उदाहरण म्हणून आम्ही याकडे पाहतो. पंजाबच्या निवडणुका आल्या त्यामुळे यांना आता खलिस्थान जवळचे वाटू लागले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल यांना बोलण्याचं काय अधिकार?”
गिरीश महाजन या व्यक्तिमत्वाला अतिरेकी, खलिस्थान, ऑपरेशन ब्लू स्टार या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर पिस्तूल घेऊन जाऊन भाषण करण्याजोग्या किंवा गाववाल्यांना दाखवण्यासाठी पिस्तूल घेऊन बिबट्या शोधण्याजोग्या वाटतात असे दिसते. या व्यक्तीमत्वाला ना इतिहास माहिती ना यांचा… — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 9, 2026
“भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ” माय कंट्री माय लाईफ” या आत्मचरित्रात भाजपाने केलेल्या अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे इंदिरा गांधी यांना ऑपरेशन ब्लू स्टार करणे भाग पडले असे म्हणून क्रेडिट घेतले होते. आता तेच ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस आहे असे म्हणतात,” असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय; विद्यार्थी, उद्योग आणि GST बाबतीत महत्वाचे निर्णय…
ते पुढे म्हणाले, “नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अमृतपाल सिंग या आंदोलकाला आसाम मधील दिब्रुगड येथे जेलमध्ये पाठवले याबाबत बोलताना दुसरा भिंद्रनवाले होऊ देणार नाही असे म्हटले. आता सत्तेसाठी भिंद्रनवाले भाजपला जवळचा वाटू लागला. नुकतंच हिमाचल प्रदेश मध्ये काही समाजकंटकांनी भिंद्रनवाले याचे बसेस वर पोस्टर झळकवले म्हणून तेथील भाजपा नेत्यांनी अतिरेकी खलिस्थानी असे म्हटले. याच भाजपच्या नेत्यांनी शीखांनी केलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळेस लाल किल्ल्यावरती “निशान साहीब” फडकवले म्हणून आंदोलकांना देशद्रोही म्हटले. दमदमी टकसालचा झेंडा कोणता आहे? याचे उत्तर आता भाजपाने द्यावे. स्वर्गीय इंदिरा गांधी या देशासाठी शहीद झाल्या. स्वर्गीय अरुणकुमार वैद्य यांच्या शहादतेचा तरी विचार केला पाहिजे. भाजपा देशविरोधी असल्याबरोबरच महाराष्ट्रद्रोही ही आहे याचे हे उदाहरण आहे,” अश्या शब्दांत त्यांनी भाजपसह महाजनांवर हल्लाबोल केला.
ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस, गिरीश महाजन यांचे वादग्रस्त विधान






