गोकुळ गितेंची माघार तरी महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट भिवंडीतील रिसॉर्टमध्ये
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून गोकुळ गिते यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतरही महायुतीकडून सावध पावले उचलली जात असल्याचे चित्र दिसत आहे. गिते यांच्या माघारीनंतर नाशिकमधील काही नगरसेवकांना थेट भिवंडीतील रिसॉर्टमध्ये हलविण्यात आल्याची माहिती समोर आली असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सुमारे 20 ते 22 नगरसेवकांना भिवंडीतील अंजूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि मतदानाच्या दिवशी अनपेक्षित राजकीय घडामोडी टाळता याव्यात, यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली असली तरी त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे नाराज मतदार किंवा पक्षांतर्गत असंतोष असलेले सदस्य ऐनवेळी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. याच कारणामुळे महायुतीने कोणताही धोका पत्करू नये, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
रात्री उशिरा शिवसेना नेते आणि खासदार नरेश मस्के तसेच नुकतेच विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आलेले रविंद्र फाटक यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, या सर्व घडामोडींना राजकीय रंग देण्याचे कारण नसल्याचे नरेश मस्के यांनी स्पष्ट केले. हा शिवसेनेचा विभागीय मेळावा असल्याचे सांगत त्यांनी रिसॉर्टमधील उपस्थितीचे स्पष्टीकरण दिले.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात मित्रपक्षांतील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीचे गणित अधिक गुंतागुंतीचे झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत यांना स्वतः मैदानात उतरावे लागले होते. दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा जाहीर केला. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या नियमांनुसार त्यांचे आणि प्रसाद हिरे यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे नाराज मतदारांकडून पसंतीक्रम मतदानात वेगळे संकेत मिळू शकतात, अशी भीती अद्याप कायम आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची पद्धत वेगळी असल्याने पक्षादेशापेक्षा वैयक्तिक निर्णयाला अधिक वाव असतो. त्यामुळे मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत मतदारांची मने सांभाळणे आणि संभाव्य दगाफटका रोखणे हेच सध्या सर्व पक्षांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. यामुळेच गोकुळ गिते यांच्या माघारीनंतरही महायुतीने नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती स्वीकारल्याची चर्चा रंगली असून, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील पुढील प्रत्येक घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






