Operation Tigerच्या चर्चांदरम्यान ‘मातोश्री’वर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक
राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘मातोश्री’वर पक्षाच्या लोकसभा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांचेही विशेष लक्ष लागले होते.
ठाकरे गटाचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत पक्षातील एकजूट कायम ठेवण्यासाठी आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे मानले जात आहे.
बैठकीसाठी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रत्यक्ष ‘मातोश्री’वर उपस्थिती लावली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी विविध राजकीय विषयांवर चर्चा केली.
Maharashtra Politics : रामदास आठवलेंनी थेट शरद पवारांनाच दिली ‘ही’ मोठी ऑफर; राजकीय चर्चांना उधाण
मुंबईत येणे शक्य न झालेल्या काही खासदारांनी ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला. यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी मुलीच्या आगामी विवाहसोहळ्याच्या तयारीमुळे ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर हे विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्यांनीही डिजिटल माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवला.
मात्र काही खासदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी. ते सकाळपासून संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली. गेल्या दोन दिवसांपासून ते कुटुंबासह बाहेरगावी असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या कुटुंबासोबत असल्याचे समजते. याबाबतचा संदेश त्यांनी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवला आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव हेही कौटुंबिक कार्यक्रमामुळे बैठकीस गैरहजर राहिले. मतदारसंघात सुरू असलेल्या पारंपरिक ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना मुंबईत येणे शक्य झाले नाही.
दरम्यान, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे बैठकीच्या वेळेपर्यंत ‘मातोश्री’वर पोहोचले नव्हते. मात्र आपण बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी पक्ष नेतृत्वाला आधीच दिली होती.
ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी काही खासदारांविषयी सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे ही बैठक केवळ नियमित आढावा बैठक न राहता पक्षाच्या भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे या बैठकीकडे राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
आता या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना कोणता संदेश देतात आणि पुढील राजकीय वाटचालीबाबत कोणती भूमिका स्पष्ट करतात, याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी ! वळसे पाटलांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीचं कारण आलं समोर






