महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा
एकीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले यांचा दणदणीत विजय झालेला असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील सर्वात मोठा चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरेंनी हातात ‘कमळ’ घेतल्यामुळे विखे पाटलांनी जिल्ह्यात ‘डबल स्ट्राईक’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांचा हा प्रवेश केवळ साधे पक्षांतर नसून त्यामागे मोठी राजकीय गणिते आहेत. तनपुरे यांची विधान परिषदेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम केलेल्या तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार गटाची मोठी पडझड झाली असून, जिल्ह्यात पक्षाला मोठे नेतृत्वच उरले नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या संपूर्ण राजकीय महानाट्याचे पडद्यामागचे खरे सूत्रधार माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील हेच असल्याचे आता समोर आले आहे. हा प्रवेश अचानक झालेला नसून, अत्यंत शांतपणे आणि गुप्तपणे आखलेल्या रणनीतीचा भाग होता.
संवादाची दारे खुली
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या तब्बल ६ महिने आधीपासूनच डॉ. सुजय विखे पाटील हे प्राजक्त तनपुरे यांच्या थेट संपर्कात होते.
पोटनिवडणुकीतून माघार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. तो निर्णय म्हणजे या भाजप प्रवेशाची पहिली नांदी होती.
अक्षय कर्डीले यांच्या विजयाचे ‘किंगमेकर’- डॉ. सुजय विखे
राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा भगवा फडकवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी रात्रीचा दिवस केला होता. अक्षय कर्डीले यांना पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना थेट विधानसभेत पाठवण्यापर्यंतची संपूर्ण सूत्रे सुजय विखे यांच्याच हातात होती.
११ पेक्षा जास्त झंझावाती सभा
सुजय विखेंनी केवळ राहुरीच नाही, तर नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील पक्ष संघटना आणि नाराज कार्यकर्त्यांना एकत्र बांधत ११ हून अधिक प्रभावी जाहीर सभा घेतल्या. स्वतः मैदानात उतरून त्यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले आणि अक्षय कर्डीले यांच्यासाठी निर्णायक विजयाचे वातावरण तयार केले.
विखेंचा हा ‘डबल स्ट्राईक’ विरोधकांसाठी धोक्याची घंटा का?
जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरुद्ध तनपुरे-गडाख-पवार असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, डॉ. सुजय विखे पाटील यांनी एकाच वेळी दोन मोठे मासे गळाला लावले आहेत.
पहिला फटका:- राहुरीत स्वतःचा हक्काचा माणूस अक्षय कर्डीले आमदार केला.
दूसरा फटका:- ज्यांच्याशी राजकीय लढत होती, त्या मूळ विरोधी नेत्यालाच प्राजक्त तनपुरे आपल्या तंबूत ओढले.
यामुळे आता राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यात भाजपला आव्हान देणारा सक्षम विरोधी चेहराच शिल्लक राहिलेला नाही. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अचूक टायमिंग साधत जिल्ह्यात शरद पवार गटाचे पारडे पूर्णपणे रिकामे केले आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांवर या महा-बदलाचा थेट प्रभाव पडणार, हे आता निश्चित झाले आहे.






