तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक! बदली न करण्यासाठी मंगळवेढ्यातील जनता रस्त्यावर
Tukaram Mundhe Transfer: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा विक्री तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध गैरप्रकारांवर सुरू केलेल्या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. त्यांच्या प्रामाणिक, धाडसी आणि जनहिताच्या कार्यशैलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवेढा शहरात त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी तुकाराम मुंडे यांची किमान तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी शासनाकडे केली. राज्यभर सुरू असलेल्या त्यांच्या कठोर कारवाईमुळे अनेक भेसळखोर, गुटखा माफिया, बनावट औषध विक्रेते आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवेढा परिसरातही दिवसेंदिवस वाढत चाललेले भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, बनावट औषधांची विक्री, विविध अवैध व्यवसाय आणि नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रवृत्ती यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रामाणिक अधिकारी जर निर्भयपणे आणि निष्पक्षपणे जनतेच्या हितासाठी काम करत असतील, तर समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, या भावनेतून हा दुग्धाभिषेक करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
तुकाराम मुंडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, लोकहिताला प्राधान्य आणि नियमांचे कठोर पालन यांचा आदर्श निर्माण केला आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांनी कोणताही दबाव न मानता कायद्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजाने एकजूट दाखवणे ही काळाची गरज असून, शासनानेही अशा अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनामध्ये मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, युवक, शेतकरी, व्यापारी, महिला, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
“खुर्चीचा मान पदामुळे मिळतो, पण जनतेचा मान सेवेमुळे मिळतो. शासनाचा पगार हा फक्त घर चालवण्यासाठी नसून जनतेची कामे प्रामाणिकपणे पार पाडल्याबद्दल मिळणारी लोकसेवेची पावती आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल तर इतर अधिकाऱ्यांनीही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.”
— सतीश दत्तू
अध्यक्ष, वारी परिवार, मंगळवेढा






