आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं...
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी कार्यरत आहेत. मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षणव्यवस्था ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया असल्याचा त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे. आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमिततेच्या तक्रारी समोर येताच केंद्र सरकारने तातडीने कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला, परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आणि पुढील वर्षापासून NEET परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर आधारित (CBT) पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली. धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत या निर्णयाचे श्रेय देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिले. त्यांनी हा तरुणांच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.
राऊत म्हणाले की, NEET-UG 2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहारानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर-मंतरसह देशभरात आंदोलन झाले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी सरकारला इशारा दिला होता की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर 26 तारखेला यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्यात येईल. मात्र त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “आंदोलनाला परदेशातून पैसा येत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. सरकारमधून आंदोलन चिरडून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. पण तब्बल 12 वर्षांनंतर एका जनआंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ही लोकशाहीला नवसंजीवनी देणारी घटना आहे.”
राऊत यांनी पुढे सांगितले की, हा केवळ दिल्लीपुरता मर्यादित संघर्ष नव्हता. पुणे, मुंबईसह देशभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. अनेक तरुण-तरुणींना लाठीचार्जचा सामना करावा लागला, जखमी व्हावे लागले आणि त्यानंतर सरकारला जाग आली, असा आरोप त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर आणखी मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला इशारा
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते, असा दावाही संजय राऊत यांनी केला. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.






