बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार देणार? शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Satara Politics: बारामती पोट निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे. अजित दादांच्या निधनानंतर आमच्या पक्षाने निर्णय घेतला की त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा नाही. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचे समजते आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रांत अध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा करेन कारण या दोन्ही जागा ह्या राष्ट्रवादीच्या आहेत त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. राज्यसभेच्या वेळी देखील अनेक जण इच्छुक असतात मग आम्ही चर्चा करून त्यातून मार्ग काढतो यावेळी देखील चर्चा करून मार्ग काढू असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
ऑन अवकाळी पाऊस अवकाळी पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आकस्मिक निधीतून , मदत आणि पुनर्वसन निधीतून तरतूद कमी केलेली दिसते आहे. या सरकारच्या धोरणाला आम्ही विधिमंडळात आक्षेप देखील घेतला होता. दुर्दैवी बाब म्हणजे शासनाकडून अनेक बाबी लपवल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून मिळणारी 25000 कोटी रुपयांची मदत मिळालीच नाही. केंद्राकडून मदत नाही मिळाली तरी राज्य सरकारकडून आम्ही मदत पोहोचवली आहे असं मंत्र्यांकडून सांगितलं जातंय.
विमा कंपन्यांवर आमचा आक्षेप आहे. वेळेवर पंचनामे होत नाहीत. केंद्रीय पथक देखील सर्व काही संपल्यानंतर येतं हे दुर्दैवी आहे.तत्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे. पंचनामे नंतर करा. कर्जमाफीच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा फसवा आहे. निवडणुकी वेळी मत घ्यायची निवडणूक झाली की सौरऊर्जा माथी मारायची, विजेच्या बाबतीत आणि कर्जमाफीच्या बाबतीत अडचणी निर्माण करायच्या. ज्याच्याकडे घर आणि गाडी आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही अशी माहिती मला मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांचा यलगार पाहायला मिळेल.
शशिकांत शिंदे म्हणाले की, ” सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद सभापती निवडी वेळी जमावबंदी लागू केली आहे हे उशिरान सुचलेलं शहाणपण आहे. बैल गेला आणि झोपा केला अशी त्यांची अवस्था आहे. ही पण त्यांची स्टेटस जी असेल. यावेळी तरी सीसीटीव्ही व्यवस्थित चालू आहेत का बघावे लागतील. सीसीटीव्ही बंद होते पण सभेच्या वेळी तरी सभेचे चित्रीकरण झालं आहे का हे मला विचारायचं आहे. एका उमेदवाराने हात वर केला नसताना त्याचे मतदान गृहीत धरले ही अक्षम्य चूक आहे. हा पार्सिलिटी चा प्रकार आहे. या सभेचे चित्रीकरण आणि सीसीटीव्ही चित्रीकरण आम्ही मागतोय ते जर मिळालं नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत.”
” उद्या होणारी सभापती निवड तरी लोकशाहीच्या माध्यमातून व्हावी अशी अपेक्षा आहे. आमच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार भाजपने स्वतःकडे घेतला तर त्याला लगेच चार-पाच कोटींची कामे कशी मिळतात. सरकारी तिजोरीतून अमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचा नवीन फंडा सुरू झाला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात हे घडतंय हे दुर्दैवी आहे. हा पैशाचा बाजार त्यांनाच लखलाभ मात्र जनता याबाबत नक्कीच विचार करेल.यावेळी तरी लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी आणि सदस्यांनी निर्भीडपणे आपलं मत द्यावे. ”
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरही शशिकांत शिंदेंनी भाष्य केलं. ” जर एखाद्या कोणी गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र पीडित महिलेवर कारवाई करणे योग्य नाही. मात्र जे जे कोणी यात सहभागी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी. SIT च्या तपासात अनेक गोष्टी पुढे येतात. मग त्यात हवाला चा विषय असो,त्याचा CA चे नाव देखील आले आहे. या माध्यमातून कुठे कुठे पैसा जमवला आणि गुंतवला. कायदेशीर गुंतवला की बेकायदेशीर गुंतवला .या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आणि कारवाई देखील होणं गरजेचं आहे.
सुनेत्रा पवार संसदेत एकट्याच फिरत होत्या. सूत्रांच्या माहितीप्रमाणे आम्हाला देखील बरीच माहिती मिळते आहे. पण आत्ताच त्यावर बोलणं योग्य नाही. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या दिल्लीला गेल्या होत्या.त्याचे इतर नेतेमंडळी त्यांच्यासोबत का नव्हते याची मला कल्पना नाही. त्यांनीच उत्तर दिलं की पत्रकारांना कल्पना असेल मात्र त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असंही शशिकांत शिंदेंनी नमुद केलं.






