वनराईत ‘स्वर्गीय नर्तकाचे’ आगमन (फोटो- विवेक आंबेरकर)
‘स्वर्गीय नर्तका’ला पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले कर्नाळ्याकडे
दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कर्नाळा अभयारण्यात
लक्षणीयरीत्या वाढला स्वर्गीय नर्तका’चा वावर
सुनयना सोनवणे/ पुणे: कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि परिसरातील हिरवीगार वनराई सध्या एका अलौकिक सौंदर्याच्या साक्षीदार ठरत आहे. निसर्गाच्या कुंचल्यातून जणू काही पांढरी शुभ्र लाट साकारावी, असा देखणा ‘इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ अर्थातच ‘स्वर्गीय नर्तक’ यंदा मोठ्या संख्येने या भागात दाखल झाला आहे. आपल्या मखमली शुभ्र-पांढऱ्या आणि तपकिरी छटेच्या लांबसडक शेपटीसह, निळसर तुऱ्याने सजलेला हा पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले कर्नाळ्याकडे वळत आहेत. पुणे मुंबई महामार्गालगत आणि दोन्ही शहरापासून जवळ असल्यामुळे येथे पर्यटक, पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कर्नाळा अभयारण्यात असतो; मात्र यंदाचे दृश्य काहीसे वेगळे आणि अधिक सुखावह असल्याचे चित्र आहे.
कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्हे गावाच्या शिवारात ‘स्वर्गीय नर्तका’चा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. झाडांच्या फांद्यांवर विसावलेला किंवा हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहताना जणू स्वर्गीय सौंदर्य पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. नुकतेच या भागात या पक्ष्याची नयनरम्य दृश्ये वन्यजीव छायाचित्रकार विवेक आंबेरकर यांनी टिपली आहेत. त्यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, “एखाद्या पांढऱ्या शुभ्र फितीप्रमाणे हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहणे, हा केवळ निसर्गदर्शन नसून ध्यानाचा अनुभव असतो. कल्हे गावाजवळ ज्या पद्धतीने या पक्ष्यांचे दर्शन होत आहे, ते पाहता निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.”
मेवाडचे शूर राजपूत राजा महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 19 जानेवारीचा इतिहास
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, यावर्षी कर्नाळा अभयारण्य आणि लगतच्या जंगल परिसरात पक्ष्यांची संख्या आणि विविधता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. केवळ ‘स्वर्गीय नर्तक’च नव्हे, तर अनेक दुर्मिळ पक्षी यंदा मोठ्या संख्येने दर्शन देत आहेत. वाढलेली वनराई, जंगलातील शांत वातावरण आणि मानवी हस्तक्षेपात झालेली घट यामुळे या पक्ष्यांचा मुक्काम अधिक सुरक्षित व सुखकर झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
कर्नाळ्याच्या वनराईत सध्या सुरू असलेला हा पक्षीवैभवाचा उत्सव निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत असून, भविष्यातही या जैवविविधतेचे जतन व्हावे, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा
या स्वर्गपक्षाविषयी थोडक्यात….
हा जंगलातील सर्वात देखण्या पक्ष्यांपैकी एक मानला जातो. नर पक्ष्याची लांब, रेशमी शेपटी आणि पांढरा अथवा तांबूस-तपकिरी रंग त्याची खास ओळख आहे, तर मादीचा रंग तुलनेने साधा असतो. डोळ्याभोवती दिसणारी निळसर कडा हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा पक्षी दाट जंगल, पानगळीची वनराई, बागा असलेल्या भागात आढळतो. कीटकभक्षी असलेला स्वर्गपक्षी हवेत उडणारे कीटक अचूकतेने टिपतो. एप्रिल ते जुलैदरम्यान याचा प्रजननकाळ असतो. सध्या हा पक्षी ‘धोक्यात नसलेला’ असला तरी जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे यामुळे काही भागांत त्यांची संख्या कमी होत आहे.






