फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Today in History 1st August: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे) यांची जयंती आज साजरी केली जाते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या लहानशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. कोणत्याही औपचारिक शिक्षणाचा अभाव असतानाही त्यांनी आपल्या अथांग प्रतिभा आणि संघर्षाच्या जोरावर मराठी साहित्यात व लोककलेत क्रांतिकारक योगदान दिले. त्यांनी रचलेल्या लावण्या, पोवाडे, कथा आणि कादंबऱ्यांमधून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी व कामगार वर्गाच्या व्यथा आणि संघर्षाला वाचा फोडली. ‘फकीरा’ ही त्यांची कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते. तसेच, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांच्या शाहिरीने आणि कवनांनी जनतेला जागृत करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.






