मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ऐतिहासिक इमारतीमध्ये शिव्यांचा भडीमार व अश्लील वाक्यांचा वापर करून रॅप साँग (Rap Song) शूट करण्यात आले होते. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना पत्र लिहित या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
पुणे विद्यापीठाच्या आवारात आणि मुख्य इमारतीत चित्रित केलेले रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या गाण्यातील शब्दांवर सुरुवातीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रॅप गाणे केलेल्या तरुणाला पाठिंबा दिला होता. आता मात्र, अजित पवार यांनी याबाबत थेट राज्यपालांना पत्र लिहून यावर नाराजी व्यक्त केली.
अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तूला फार मोठा इतिहास आहे. अशा या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी, अश्लील भाषेतील रॅप साँगचे शुटिंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. विद्यापीठात घडलेला हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या घटनेची शासन स्तरावरूनही दखल घेण्याची गरज आहे. तसेच या प्रकारामुळे राज्यातील जनतेची प्रचंड संतप्त भावना आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत शासनस्तरावरूनही आदेश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मार्गदर्शक सूचना द्याव्यात
याशिवाय, भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात किंवा शिक्षण संकुलात होणार नाही. यासाठी मार्गदर्शक सूचना शासनामार्फत निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी त्या पत्राद्वारे केली आहे.