सूर्यकुमार यादव आणि एडेन मार्कराम(फोटो-सोशल मीडिया)
India vs South Africa T20 series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळून झाली आहे. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला आहे. या मालिकेच्या समाप्तीनंतर, दोन्ही संघ आता पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत अमानेसामाणे येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये खेळवण्यात येणार आहे. चाहत्यांना ही मालिका रोमांचक होणार अशी अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेने मागील कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव केला होता, तर भारताने एकदिवसीय मालिकेत बाजी मारली. आफ्रिकन टी२० मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून एडेन मार्कराम दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यांपैकी भारतीय संघाने १८ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने १२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आफ्रिकन संघाविरुद्ध भारताचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे.
भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकणे हे दक्षिण आफ्रिकेसाठी नेमहीच कठीण राहिले आहे. आफ्रिकन संघाने भारताविरुद्ध फक्त दोन द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. २०१२ मध्ये दोन्ही संघांनी एक सामन्यांची मालिका खेळली होती, ज्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१५ मध्ये आफ्रिकन संघाने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. तेव्हापासून, गेल्या १० वर्षांत दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध एक देखील टी-२० मालिका जिंकलेली नाही.
दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेसाठी अनेक मोठे स्टार खेळाडू जे सामना जिंकून देऊ शकतात अशांचा भरणा आहे. भारतीय संघात सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्यासारखे तगडे स्फोटक फलंदाज आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघात डेवाल्ड ब्रेव्हिस, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉकसारखे घातक अनुभवी खेळाडू आहेत.
हेही वाचा : नाद करा आमचा कुठं! 2025 च्या वर्षात ‘रो-को’नी घातला धावांचा रतीब! एकदिवसीय क्रिकेटमध्ये दाखवला दम
भारत T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सनदार.
दक्षिण आफ्रिका T20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅन्सन, क्विंटन डी कॉक, डोनोव्हान फरेरा, ॲनरिक नॉर्टजे.






