पाकिस्तानवर ६४ धावांच्या विजयानंतर, हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना यांच्यात भांडण झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, पाकिस्तानी खेळाडू आधी हरमनप्रीतला काहीतरी बोलते, त्यानंतर हरमनप्रीतने तिचा गळा पकडून तिला ढकलले. नंतर पंच आणि इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केला. हा व्हिडिओ गेल्या १० तासांत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. मात्र, या व्हायरल व्हिडिओमागचं वास्तव काहीसं वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. संबंधित घटनेचा संपूर्ण संदर्भ पाहिल्यानंतर तो एआय-निर्मित (AI- Generated) असल्याचे आढळले.
हरमनप्रीत कौर आणि फातिमा सना यांच्यातील वाद आणि मैदानातील मारामारीचा हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाचा जर्सी क्रमांक १४ आहे, परंतु व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा जर्सी क्रमांक ५५ दाखवण्यात आली आहे. पंचांची जर्सी सहसा लाल रंगाची असते, परंतु व्हिडिओमध्ये गडद लाल रंगाची जर्सी दिसत आहे. असे अनेक पुरावे हा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध करतात.
Things got tense in the middle as Harmanpreet Kaur and Fatima Sana Sheikh exchanged some heated words during the India vs Pakistan showdown. 😤🔥👀#INDvsPAK pic.twitter.com/62BZPjzkKr — Faruk (@uf2151593) June 14, 2026
ज्या लोकांनी भारत-पाकिस्तान महिलांचा संपूर्ण सामना पाहिला, त्यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले, आम्ही संपूर्ण सामना पाहिला. पण सामन्यात असे काही पाहिले नाही. एका युजरने टिप्पणी केली, हे एआय ॲप जुने आहे, नवीन ॲप वापरा.
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. भारताच्या १७० धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १७ षटकांत १०६ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या दीप्ती शर्माला तिच्या ५ विकेट्स घेतल्याबदद्ल कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दरम्यान, भारत-पाक सामन्याभोवती नेहमीच प्रचंड उत्सुकता असते, त्यामुळे अशा व्हायरल क्लिप्स लवकरच चर्चेचा विषय बनतात. मात्र सत्य तपासल्याशिवाय निष्कर्ष काढू नये, असा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा मिळतो.






