Cricket World Cup 2011! आजच्याच दिवशी भारताने वनडे विश्वचषक उंचावला, त्या षटकाराने सर्वांच्याच डोळ्यात पाणी.. (फोटो-सोशल मीडिया)
ODI Cricket World Cup 2011 : भारताने याच दिवशी 2011 मध्ये 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. श्रीलंकेने भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 275 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर फार काही न करता स्वस्तात बाद झाले होते, तेव्हा मैदानात आलेले गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी डाव सावरत सारी सूत्रे हातात घेतली होती. यानंतर कर्णधार एमएस धोनीने 91 धावांची नाबाद खेळी करत असताना एक षटकार खेचून टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. हा क्षण भारतीय चाहत्यांसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला होता. याच एकदिवसीय विश्वचषकविषयी जाणून घेऊया.
श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर संघाला 274 धावापर्यंत मजल मारता आली होती. त्याने 103 धावांची खेळी केली होती. भारताकडून झहीर खान आणि युवराज सिंगने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लसिथ मलिंगाने भारताला धडकी भरवणारा पहिला ओव्हर टाकला. त्यात त्याने दुसऱ्या चेंडूवर वीरेंद्र सेहवागला एलबीडब्ल्यू बाद केले यानी भारतीयांचा ठोका चुकला.
संपूर्ण स्पर्धेत सचिन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती, त्यातील विशेष खेळी(85) पाकिस्तानविरोधात आली होती. अंतिम सामन्यात मात्र मलिंगाने सचिनला (18) 7 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी पाठवले. तेव्हा भारताचे 31 धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी गेले होते. या वाईट परिस्थितीमध्ये टीम इंडियाचा डाव सावरला तो म्हणजे गौतम गंभीर आणि विराट कोहली (35) या फलंदाजांनी. यांनी 83 धावांची भागीदारी केली होती. यानंतर गंभीरने एमएस धोनीसोबत १०९ धावांची भागीदारी रचत भारताचा विजय सोपा केला होता. गौतम गंभीरला थीसारा परेराने बाद केले आणि ही जोडी फोडली. गंभीरने 122 चेंडूचा सामना करत 97 धावांची शानदार खेळी केली होती.
गंभीरसोबत भागीदारी केल्यानंतर रचल्यानंतर एमएस धोनीने युवराज सिंगसह डाव पुढे नेण्यास सुरवात केली. धोनीने 79 चेंडूत 91 धावांची खेळी केली. त्याने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर अप्रतिम आणि सर्व भारतीयांच्या लक्षात राहील असा विजयी षटकार ठोकला होता. त्यावेळी मैदनावर धोनीसोबत युवराज सिंगही एका बाजूने उभा होता. 28 वर्षांनंतर भारताने दुसरा एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावावर केला होता. त्या रात्री भारतात दिवाळी साजरी करण्यात आली होती. संपूर्ण देशातील लोक रस्त्यावर विजयाचा आनंद साजरा करताना दिसून येत होती. अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय दिग्गज खेळाडूंना आपले अश्रू अनावर झाले होते. ते सर्व मैदानावरच रडताना सर्व देशवासीयांनी बघितले होते. सचिन, गंभीर, हरभजन, धोनी, युवराज सिंग यासारख्या दिग्गजांच्या डोळ्यात पाणी तरळताना सर्वांनीच पाहिले होते.
हेही वाचा : LSG vs PBKS : निकोलस पूरनला बाद करताच चहलचा सुटला ताबा! केली हीन भाषेत टिप्पणी, पाहा Video
वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, एमएस धोनी, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, झहीर खान, मुनाफ पटेल, श्रीशांत.