बुडापेस्टमध्ये , १-१ अशा बरोबरीनंतर एका रोमांचक शूटआऊटमध्ये PSG ने आर्सेनलला ४-३ ने हरवून UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली. मात्र, या विजयानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आगीच्या ज्वाला भडकल्या. संपूर्ण शहर धुराने व्यापले होते. जल्लोषामुळे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पेटला. शहरभर आगी लावण्यात आल्या आणि अनेकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, PSG च्या विजयानंतर सुमारे २०,००० समर्थक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पॅरिस रिंग रोडवर वाहतूक कोंडी केली , दुकाने फोडली, वाहनांना आग लावली आणि पोलिसांवर फटाके फेकले आणि सहा वाहनांचे नुकसान केले.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला. या घटनांमध्ये अनेक पोलिस जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
काही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, चॅम्प्स एलिसीवर (Champs Elysees) चाहते फटाके फोडताना, फ्लेअर्स पेटवताना आणि मोठ्या संख्येने जमलेले दिसत होते. काही भागांमध्ये जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तर पार्क डेस प्रिन्सेस (Parc des Princes) आणि शहराच्या इतर भागांमध्येही किरकोळ चकमकी झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजेपर्यंत, पॅरिस पोलिसांनी १३० हून अधिक लोकांना अटक केली होती. अंतिम सामना पाहण्यासाठी पॅरिसभर हजारो पीएसजी चाहते जमले होते, तर पार्क डे प्रिन्सेस स्टेडियममध्ये ४०,००० हून अधिक समर्थक खचाखच भरले होते, जिथे मोठ्या पडद्यांवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातून ७०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असून ४०० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात अटक पॅरिसमध्ये झाली. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हजारो पोलिस तैनात करण्यात आले होते.
पॅरिसमधील हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. रस्त्यावर जळणाऱ्या गाड्या, धूर आणि पोलिसांशी झटापट यामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षीही PSG च्या विजयानंतर अशाच प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला होता.
या सामन्यासाठी फ्रान्समध्ये हजारो पोलिस तैनात करण्यात आले होते. तरीही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील काही दिवस पॅरिसमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.






