रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला फिटनेस टेस्टसाठी पोहोचले(फोटो-सोशल मीडिया)
Rohit and Gill arrive in Bengaluru for fitness test : भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे खेळाडू फिटनेस मूल्यांकन आणि तयारीसाठी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले आहेत. आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी आशिया कप हा टी २० स्वरूपात खेळवला जाणार आहे. त्याआधी या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवलेले खेळाडू आशिया कपसाठी ४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये एकत्र येणार आहेत. फिटनेस चाचणीला रविवारपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या फिटनेस टेस्ट दरम्यान सर्वांच्या नजरा या भारतीय एकदिवसीय संघाचा ३८ वर्षीय रोहित शर्मा याच्यावर असणार आहेत. एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्याआधी तो ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभागी होणार आहे किंवा नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती कळू शकेलेली नाही. तथापी, रोहित शर्माला सीओईमधील फिटनेस टेस्ट उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या खेळवण्यात येत असणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पूर्व विभागाविरुद्ध खेळू शकला नाही. त्याच्या आजारपणामुळे त्याला या स्पर्धेत भाग घेता आलेला नाही. शुभमन गिल आता फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरूला पोहचला आहे. गिल बेंगळुरूहून दुबईला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण यावेळी खेळाडू त्यांच्या संबंधित ठिकाणाहून थेट दुबईला पोहचणार आहेत.
गिल आणि रोहित या खेळाडू व्यतिरिक्त यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा देखील स्पर्धेपूर्वीच्या तयारीसाठी सीओईमध्ये दाखल झाला आहे. पीटीआयला मिळालेल्या माहितीनुसार, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर हे देखील सीओईमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ठाकूर पश्चिम विभागाचु धुरा वाहणार आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील या देशांतर्गत स्पर्धेत खेळणार आहेत.