(फोटो सौजन्य: Instagram)
आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात आणि त्यामुळेच देशात अनेक धार्मिक सोहळे दरवर्षी उत्साहाने पार पाडले जातात. आता हिंदू धर्मात वारीला फार महत्त्व! दूरदूरवरून येणारे भाविक वारीत सामील होतात. मुखी हरिनामाचे नामस्मरण, गळ्यात जपमाळ आणि हातात टाळ घेऊनी वारकरी संप्रदाय मोठ्या भावनेने देवाची वारी करतात. तर आता अशाच एका वारीतील एक अद्भुत आणि मनाला सुखावून जाणारे दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
इंटरनेट तुम्हाला कधी काय दाखवेल याचा काही नेम नाही. इथे आजवर अनेक विचित्र आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टी तुम्ही पहिल्या असतील मात्र अलीकडेच एक सुंदर आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी सुंदर आहेत की ती पाहता क्षणीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमचे हृदय करुणेने भरून उठेल. वास्तविक आपल्या देशात धर्माचे राजकारण किती चालते हे आपल्यापासून लपून राहिले नाही. त्यातही हिंदू मुस्लिम बांधवांमधील वाद म्हणजे सामान्यच, यामुळे देशात अनेकदा गंभीर परिस्थितीही निर्माण झाली आहे. अनेक युद्धे झाली, आंदोलने झाली पण धर्माला आजवर कुणी देशातून बाहेर काढू शकला नाही आणि त्यातच एकतेचा संदेश घराघरात पोहचवणारा एक सुंदर व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओ पुणे शहराचा असून यात आपल्याला विठुरायाच्या पालखी सोहळ्यातील काही दृश्ये दिसून येत आहेत. यातच लक्षवेधी ठरणारी बाब म्हणजे, मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना केलेले वस्तूंचे, अन्नधान्याचे वाटप. देशात धर्मावरून इतके तंटे, वाद सुरु असतानाच एकोप्याचे हे असे दृश्य दिसणे म्हणजे मुखी दुग्धशर्करेचा लाभच म्हणावा लागेल! व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना गरजेच्या वस्तूंचे वापर वाटप करताना दिसत आहेत तर वारकरीही ही मदत आनंदाने स्वीकारत वारीसोहळ्यात मग्न होताना व्हिडिओत दिसून आले. दरम्यान हा व्हिडिओ आता इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्यांनी सर्वांनाच व्हिडिओच्या प्रेमात पाडले आहे.
‘भारतात जाऊ नका…’, असे का म्हणाली अमेरिकन इन्फ्लुएन्सर? VIDEO पाहून कळेल सत्य
हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याने आणि एकतेचे हे दृश्य @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. यात लिहिले आहे, “सालाबाद प्रमाणे यंदाही इर्शाद अली शहा ऊर्फ पठाण शहा बाबा दर्गा सेवा ट्रस्ट (पौड फाटा) व हाजी मक्केशा मस्जिद डेक्कन आणि सबर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रतिकाचे समाजापुढे शुद्ध विचार ठेवून विठुरायाच्या पालखी सोहळ्यातील वारकरी संप्रदायास पाणी, फळ आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी इर्शाद अली शहा ऊर्फ पठाण शहा बाबा दर्गा सेवा ट्रस्ट (पौड फाटा) चे ट्रस्टी असरार सरदार खान, हाजी मक्केशा मस्जिद डेक्कनचे ट्रस्टी मुख्तार मणियार, आसिफ मिस्त्री आणि सबर फाऊंडेशन अध्यक्ष अरबाज शेख आणि इतर सभासद उपस्थित होते.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.