बांगलादेशात स्फोटक तणाव! शेख हसीना यांच्या निकालापूर्वी हिंसाचाराचा भडका; ढाका किल्ल्यांत बदलले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
शेख हसीना यांच्यावरील मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाचा निकाल आज अपेक्षित, त्यापूर्वी ढाक्यासह अनेक शहरांत हिंसाचार, स्फोट, जाळपोळ.
लष्कर व BGB तैनात, रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत; देशव्यापी तणावाने जनजीवन ठप्प.
व्यवसाय क्षेत्रात भीतीचे वातावरण, वस्त्र उद्योगास मोठा फटका बसण्याची शक्यता; राजकीय अस्थिरतेने परकीय गुंतवणूक धोक्यात.
Bangladesh verdict violence : बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्याचा निकाल जाहीर होण्याआधीच देशभरात गंभीर हिंसाचार उद्भवला आहे. राजधानी ढाका(Dhaka), चिटगाव, राजशाही, बरिसालसह अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्रीपासून जाळपोळ, स्फोट, रस्तेबंदी आणि पोलिसांशी धुमश्चक्री सुरू असून देशात युद्धसदृश परिस्थिति निर्माण झाली आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी वाढलेल्या तणावामुळे ढाक्यात हाय-अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होत असल्याने सरकारने सैन्य आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) ला तातडीने तैनात केले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा दलांना दंगलखोरांना हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.
शहराच्या अनेक भागांत फटाक्यांसारखे स्फोट, कॉकटेल बॉम्ब फुटण्याचे आवाज रात्रीभर ऐकू आले. काही ठिकाणी निदर्शकांनी सरकारी वाहने, खासगी कार व दुकानांना आग लावली. परिस्थिती एवढी बिघडली की ढाक्यातील प्रमुख रस्ते पूर्णत: निर्जन झाले. अवामी लीगने दिलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी बंदच्या आवाहनाचा मोठा परिणाम दिसला. बस सेवा थांबल्या, रेल्वे धावपळ कमी झाली आणि बाजारपेठा बंद राहिल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धचा खटला हा जुलै–ऑगस्ट 2024 मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांवरील गोळीबाराच्या आदेशांचा आरोप या प्रकरणात सर्वाधिक गंभीर मानला जातो. सरकारी वकिलांनी न्यायाधिकरणाकडे मृत्युदंडाची मागणी केल्याने हा निकाल अधिकच संवेदनशील ठरला आहे. हसीना यांनी मात्र सर्व आरोपांना सुरुवातीपासूनच फेटाळून लावले आहे. या आंदोलनानंतरच हसीनांचे सरकार कोसळले आणि त्या ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात पळून गेल्या. सध्या नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कामकाज पाहत असून अवामी लीगच्या क्रियाकलापांवर मर्यादा आणल्या आहेत.
Ahead of the verdict in the case filed against Former Bangladesh Prime Minister Sheikh Hasina, violence is being reported in various parts of Bangladesh. There have been incidents of car arson, cocktail explosions and road blockades across the country. The government has… pic.twitter.com/udTjDbS97X — ANI (@ANI) November 16, 2025
credit : social media
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील व्यापार आणि उद्योग क्षेत्रात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. बीजीएमईएचे माजी अध्यक्ष क्वाझी मोनिरुज्ज्मान यांनी सांगितले:
“परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. सातत्याने वाढणाऱ्या राजकीय संघर्षामुळे वस्त्र उद्योग, परकीय खरेदीदारांचा विश्वास आणि देशाच्या महसुलावर मोठा परिणाम होऊ शकतो.”
#WATCH | Dhaka, Bangladesh | Garment Businessman and Central Committee Member of BNP (Bangladesh Nationalist Party) Quazi Moniruzzaman says, “… As a businessman and as a politician, I am afraid of the situation. We hope that there will be free and fair elections.. I hope there… pic.twitter.com/a1iFu4PxsF — ANI (@ANI) November 16, 2025
credit : social media
बांगलादेशचा वस्त्र उद्योग हा परकीय चलनाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. लाखो मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न या अस्थैर्यामुळे धोक्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास आर्थिक संकट अधिकच गहिरे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
सध्या संपूर्ण बांगलादेशाचे लक्ष आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या आज अपेक्षित निकालाकडे खिळले आहे. निकालानुसार परिस्थिती आणखी चिघळण्याची किंवा शांत होण्याची शक्यता आहे. सरकारने नागरिकांना घराबाहेर अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून सुरक्षादले सतत गस्त वाढवत आहेत. निकाल काहीही असो, बांगलादेश सध्या अत्यंत तणावपूर्ण राजकीय व सामाजिक वळणावर उभा आहे, आणि या घडामोडींनी आगामी काही दिवसांत देशाचे भविष्य ठरवण्याची शक्यता वाढली आहे.






