Joseph Aoun : "हा तुमचा देश नाही, आमचा आहे," लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्षांचा इराणवर संताप, हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तणाव वाढला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Joseph Aoun Slams Iran Statement : मध्यपूर्वेमध्ये इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धविराम घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, आता लेबनॉनच्या अंतर्गत राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन (Joseph Aoun) यांनी थेट इराण आणि त्यांच्याच देशात सक्रिय असलेल्या ‘हिजबुल्लाह’ (Hezbollah) या सशस्त्र संघटनेविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिका घेतली आहे. प्रादेशिक राजकारणात आणि अमेरिकेसोबतच्या सौदेबाजीसाठी लेबनॉनचा बळी दिला जाऊ नये, असे स्पष्ट करत अध्यक्ष औन यांनी इराणला सुनावलेले खडे बोल सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
या तीव्र शाब्दिक संघर्षाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) एक वादग्रस्त विधान केले. इराणने दावा केला होता की, अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या कोणत्याही करारासाठी इराणची मुख्य अट ही असेल की लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर संपूर्ण युद्धविराम झाला पाहिजे. इराणच्या या दाव्यावर लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांचा संताप अनावर झाला. त्यांनी इराणच्या हस्तक्षेपाचा तीव्र निषेध करत म्हटले, “इराणने हे लक्षात ठेवावे की हा त्यांचा देश नाही, हा आमचा स्वाभिमानी देश आहे.” लेबनॉनला कोणत्याही परकीय ताकदीच्या हितासाठी चालवला जाणारा ‘प्यादा’ किंवा सौद्याचा पट्टा बनू देणार नाही, असा कडक संदेश त्यांनी वॉशिंग्टन आणि तेहरानला दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoKIsIndia: ‘हा भाग आमचा आहे’, गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या निवडणुक खेळीमुळे भारत संतप्त; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
एकीकडे राजकीय पातळीवर हा वाद सुरू असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष सीमेवर हिजबुल्लाहच्या लष्करी हालचालींमुळे तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायल संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहच्या सैनिकांनी इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांना लक्ष्य करून जमिनीवरून हवेत मारा करणारी (Surface-to-Air) घातक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात इस्रायलचे कोणतेही विमान पाडण्यात यश आले नसले, तरी या कारवाईमुळे इस्रायलच्या सीमावर्ती भागांत प्रचंड घबराट पसरली. या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ईशान्य इस्रायलमधील किरयात शमोना शहर आणि आसपासच्या आठ गावांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन (Air Raid Sirens) वाजले, ज्यामुळे हजारो नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी आश्रयस्थानांकडे धाव घेतली.
राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी केवळ इराणलाच लक्ष्य केले नाही, तर लेबनॉनमध्ये राहून समांतर सरकार चालवू पाहणाऱ्या हिजबुल्लाहचे सरचिटणीस नईम कासिम (Naim Qassem) यांनाही खडे बोल सुनावले आहेत. नईम कासिम यांनी अलीकडेच लेबनॉन सरकार उलथवून टाकण्याची आणि समर्थकांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करण्याची धमकी दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्राध्यक्ष औन म्हणाले की, लेबनॉनची जनता ही देशाची नागरिक आहे, ती कोणत्याही एका विशिष्ट संघटनेची किंवा मिलिशियाची बांधील नाही. लेबनीज जनता गेल्या अनेक दशकांपासून युद्ध, विनाश आणि विस्थापनाचे दुःख सोसत आहे. आता लोकांना शांततेत जगायचे आहे आणि अशा धमक्यांना जनता भीक घालणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण
बुधवारी वॉशिटंन येथे झालेल्या महत्त्वाच्या त्रिपक्षीय चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉनने युद्धविराम लागू करण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली होती. मात्र, हिजबुल्लाहच्या सशस्त्र अस्तित्वामुळे हा शांतता करार किती काळ टिकेल, याबाबत शंका आहे. अध्यक्ष औन यांच्या मते, या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल, तर हिजबुल्लाहचे सशस्त्र निःशस्त्रीकरण (Disarmament) करणे अत्यंत गरजेचे आहे आणि हा प्रश्न लेबनॉनला अंतर्गत पातळीवरच सोडवावा लागेल. त्याच वेळी, इस्रायलने देखील लेबनॉनच्या विवादित भूभागातून पूर्णपणे माघार घेतली पाहिजे, जेणेकरून सीमावादावर कायमस्वरूपी पडदा पडेल. सध्या लेबनॉनचे सामान्य नागरिक मृत्यू आणि विध्वंसाच्या छायेतून बाहेर पडून एका शाश्वत शांततेची वाट पाहत आहेत.






