मोहम्मद युनूस यांनी केले खळबळजनक विधान; म्हणाले, 'बांगलादेशशिवाय भारताचा नकाशा अपूर्ण' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : एकेकाळी मैत्रीपूर्ण असलेले भारत-बांगलादेश संबंध आज तणावाच्या वळणावर आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये शेख हसीना यांची सत्ता संपल्यानंतर बांगलादेशाच्या राजकारणात मोठे बदल झाले. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या अंतरिम सरकारने चीनसोबत जवळीक साधल्याने भारत-बांगलादेश संबंध बिघडल्याचे दिसते.
शेख हसीना यांच्या सत्ताकालात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध घट्ट होते. परंतु, त्यांच्या पदच्युतीनंतर परिस्थिती बदलली. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या, तर बांगलादेशच्या सत्तेवर मोहम्मद युनूस यांचे आगमन झाले. त्यांच्या धोरणांमुळे भारताबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना मोहम्मद युनूस यांनी चीनची प्रशंसा करत बांगलादेशला संकटाच्या काळात चीनने साथ दिल्याचे म्हटले. “महागाईने ग्रस्त असलेल्या परिस्थितीत चीनने आमचे हात थोपटले आहेत,” असे ते म्हणाले. चीनकडून बांगलादेशला मिळणाऱ्या मदतीचा उल्लेख करत त्यांनी चीनची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत ‘या’ ठिकाणी लपला आहे; असा झाला उलगडा या रहस्याचा
बांगलादेशची आर्थिक परिस्थिती
बांगलादेश गेल्या तीन महिन्यांपासून उच्च महागाईचा सामना करत आहे. अन्नधान्य महागाईचा दर १३ टक्क्यांवर पोहोचला असून, सरकारने व्हॅटमध्ये वाढ केली आहे. या वाढीमुळे 12 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याचा दावा सरकार करत असले तरी नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे.
मोहम्मद युनूस यांनी भारताशी ताणलेल्या संबंधांवर खेद व्यक्त करत, “बांगलादेश-भारत संबंध शक्य तितके मजबूत असले पाहिजेत,” असे सांगितले. त्यांनी भारत आणि बांगलादेशाचा नकाशा परस्परावलंबी असल्याचे उदाहरण देत दोन्ही देशांतील संबंधांची आवश्यकता अधोरेखित केली.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर निशाणा साधताना युनूस यांनी त्यांच्या सरकारच्या काळातील आर्थिक विकास खोटा असल्याचे म्हटले. “शेख हसीना यांचा ‘आमचा विकास दर सर्वोत्तम आहे’ असा दावा फसवा होता,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. युनूस यांच्या मते, बांगलादेशने केलेली प्रगती आणि सध्याची आर्थिक परिस्थिती ही जागतिक धडाही ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-बांगलादेश सीमेवर 1.4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; BSFच्या कारवाईत तस्करी उघड
सध्याची परिस्थिती पाहता, भारत आणि बांगलादेशमधील तणावाचे परिणाम दोन्ही देशांच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंधांवर पडू शकतात. बांगलादेशची चीनकडे झुकलेली भूमिका आणि भारताशी ताणलेले संबंध हे दोन्ही देशांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतात.
संपूर्ण जगाच्या नजरा या दोन देशांमधील संबंधांवर आहेत. शेजारी देशांतील सौहार्द टिकवण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे गरजेचे आहे.