कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! बांगलादेशने दिली आयात परवानगी (फोटो-सोशल मीडिया)
India Onion Imports: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आहे. बांगलादेशने अखेर भारतातून कांदा आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट फायदा भारतातील कांदा उत्पादक शेतकरी तसेच कांदा निर्यातदारांना होणार आहे. बांगलादेशने 7 डिसेंबरपासून दररोज 30 टन क्षमतेच्या 50 आयपी म्हणजेच आयात परवान्यांचे वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी आधीच अर्ज केलेल्या आयातदारांनाच हे परमीट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज भारतातून सुमारे 15 हजार क्विंटल कांदा बांगलादेशमध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, या पावलामुळे कांद्याच्या दरवाढीस चालना मिळेल आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. दीर्घकाळापासून घसरलेल्या कांदा दरांमुळे शेतकरी बिकट परिस्थितीत सापडले होते. निर्यात वाढल्याने बाजारात मागणी वाढेल आणि कांद्याचे भाव स्थिर राहतील, अशी अपेक्षा शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राज्याध्यक्ष दिघोळे म्हणाले की, “जर केंद्र सरकारने योग्य वेळी विविध देशांना कांदा निर्यातीस परवानगी दिली असती, तर शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विकावा लागला नसता.” त्यांनी भविष्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी आणू नये, अशी मागणीही केली. त्यांच्या मते, स्थिर व खुली निर्यात धोरणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. अन्य देशांनीदेखील भारतातून कांदा आयातीचा निर्णय घेतल्यास देशांतर्गत बाजारातील कांद्याच्या भावात सकारात्मक वाढ होईल. जरी हा निर्णय उशिरा घेण्यात आला असला तरी, तरीही निर्यातीचे दरवाजे उघडल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळेल.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने आणि नंतर झालेल्या पुरपरिस्थितीमुळे उन्हाळी कांद्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पिके सडली, काही ठिकाणी पिकांसह जमिनीदेखील वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. उत्पादन घटल्याने काही काळ दरात वाढ झाली होती; मात्र अलीकडेच बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली. या घसरणीचा फटका प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बसला असून त्यांच्या उत्पन्नावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
हेही वाचा : समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
या पार्श्वभूमीवर, दरातील घसरणीविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर मोर्चा काढत आंदोलनही केले. शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने कांदा दरासाठी किमान आधारभावासह स्थिर निर्यात धोरण लागू करावे. सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशकडून मिळालेल्या आयातीच्या परवानगीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणे निश्चित आहे. निर्यात वाढल्यास बाजारातील भाव सुधारणार असून, नुकसानातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मदत मिळेल. आगामी काळात केंद्र व राज्य सरकारने कांद्याबाबत स्थिर धोरण आखून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी वेगवेगळ्या शेतकरी संघटनांकडून होत आहे.






