फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IAF Agniveer Air Force Recruitment: भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर वायू भरती इनटेक ०२/२०२७’ ची अधिकृत जाहिरात (Notification) प्रसिद्ध केली आहे. यासाठी ६ जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जुलै आहे. वायुसेनेत अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जाहिरातीनुसार, या भरतीसाठी उमेदवारांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जानेवारी २०१० या कालावधीत झालेला असावा.
‘अग्निवीर वायू’ची ही भरती लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (Physical Test) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Test) या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची ४ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाईल आणि त्यांना प्रतिमहिना ३० हजार रुपये पगार मिळेल.
वयोमर्यादा: उमेदवारांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जानेवारी २०१० दरम्यान झालेला असावा.
वैवाहिक स्थिती: अर्जदार अविवाहित असणे अनिवार्य आहे.
शैक्षणिक पात्रता (विज्ञान शाखा): उमेदवार भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), गणित (Mathematics) आणि इंग्रजी (English) या विषयांसह १२ वी उत्तीर्ण असावा. १२ वीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे, तसेच इंग्रजी विषयातही स्वतंत्रपणे ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे.
डिप्लोमा धारक: ज्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / कॉम्प्युटर सायन्स / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पूर्ण केला आहे, ते देखील अर्ज करू शकतात. यामध्ये एकूण ५० टक्के गुण आणि इंग्रजी विषयातही ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
इतर शाखा: १२ वी आर्ट्स (Arts) आणि कॉमर्स (Commerce) शाखेचे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात. यामध्येही एकूण ५० टक्के गुण आणि इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असावेत. यासोबतच २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स (Vocational Course) पूर्ण केलेला असावा, ज्यामध्ये एकूण ५० टक्के गुण आणि इंग्रजीत ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
उंची (Height): पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी किमान १५२.५ सेमी असणे आवश्यक आहे. ईशान्य भारत (North East) आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील रहिवाशांसाठी ही मर्यादा १४७ सेमी, तर लक्षद्वीपच्या उमेदवारांसाठी १५० सेमी आहे.
छाती (Chest): पुरुष उमेदवारांची छाती किमान ७७ सेमी असावी आणि ती ५ सेमी फुगवता येणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी छातीची कोणतीही किमान मर्यादा नाही, परंतु ती ५ सेमी फुगवता येणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक उमेदवार भारतीय वायुसेनेच्या iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.






