फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MHT CET Admission 2026: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी कृषीशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान,बी.एस्सी (ऑनर्स)सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस दिनांक ३१ जुलै २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा वगळता इतर सर्व विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेमध्ये MHT-CET / JEE याबरोबरच NEET सामायिक प्रवेश परीक्षेचा समावेश आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
कृषी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस दिनांक १० जुलै २०२६ पासून सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २५ जुलै २०२६ होती, त्यास ३१ जुलै २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमास आजपर्यंत २१ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली २३ हजार ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत नऊ विद्याशाखेमध्ये हे चार वर्षाचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यात १९५ कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १७ हजार ५८६ आहे.
एमएचटी-सीईटी २०२६ तसेच संबंधित अभ्यासक्रमांसाठी विहित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण/पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरील संबंधित लिंकद्वारे विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक राहील.
प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश नियमावली, वेळापत्रक तसेच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट देऊन अद्ययावत सूचनांचे पालन करावे असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.






