फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Maharashtra Teacher Salary Update: राज्यात शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन व कडक नियम लागू करण्यात आला आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखले जाणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा
खासगी अनुदानित शाळा
अंशतः अनुदानित शाळा
सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्यामुळे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व शाळांपर्यंत ही माहिती त्वरित पोहोचवण्याच्या व ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.






